हुतात्मा कोतवाल मार्केट रस्त्याची दुरवस्था

। नेरळ । प्रतिनिधी ।

माथेरान या पर्यटनस्थळी असलेल्या हुतात्मा भाई कोतवाल शॉपिंग सेंटर मधील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. तसेच, या भागातील विजेच्या वाहिन्या देखील हाताला लागतील एवढ्या उंचीवर आहेत. त्यामुळे या शॉपिंग सेंटरमध्ये मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील व्यापार्‍यांच्यावतीने रामलाल खेर यांनी पालिकेला पत्र देऊन रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

माथेरान शहरात पालिकेने मुख्य बाजारपेठनंतर श्री पिसारनाथ मार्केट आणि हुतात्मा भाई कोतवाल शॉपिंग मार्केटची निर्मिती केली होती. श्री पिसारनाथ मार्केट हे रिगल नाका येथे असून कोतवाल शॉपिंग सेंटर हे रेल्वे स्टेशन समोर आहे. या मार्केट मधील गाळे स्थानिक व्यवसायिकांचे असून हुतात्मा कोतवाल मार्केटमध्ये स्थानिक व्यवसायिकांना पावसाळ्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कारण या मार्केटची रचना हि उतार भाग अशी आहे. त्यामुळे पावसाळ्यात या मार्केट मधून पाण्याचे पाट वाहत असतात. यामुळे रस्त्यावर लावण्यात आलेले पेव्हर ब्लॉक हे निखळून गेले असून रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पाणी गटारातून न जाता थेट रस्त्याने खाली महात्मा गांधी रस्त्याने वाहत येते. यामुळे या पाण्याला मार्ग काढून देण्यात यावा, अशी मागणी स्थानिक व्यापारी आणि माथेरान पालिकेचे माजी नगरसेवक आंबो चौधरी यांनी अनेकवेळा माथेरान पालिकेकडे केली आहे. मात्र, पालिकेला मोठ्या व्यवसायिक मार्केटकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याची चर्चा स्थानिक व्यापारामध्ये होत आहे.

धोकादायक वीज वाहिन्या
माथेरान शहरातील या महत्वाच्या शॉपिंग मार्केट मधील वीज वाहिन्या देखील उघड्यावर असून या वीज वाहिन्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी स्थानिक व्यवसायिक रामलाल खेर यांनी माथेरान पालिकेला पत्र देऊन रस्त्याची सुधारणा करावी, अशी मागणी केली आहे. खेर यांनी आपल्या अर्जात हुतात्मा भाई कोतवाल शॉपिंग सेंटर मधील डोक्याजवळ आलेल्या वीज वाहिन्या आणि उघड्यावर असलेल्या वीज वाहिन्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
Exit mobile version