परिवहन मंत्र्यांचे महामंडळाकडे दुर्लक्ष
। पालघर । प्रतिनिधी ।
पालघर जिल्ह्यातील जव्हार आगारात एकूण 55 एस.टी. बसेस असून त्यावर जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यातील प्रवासी अवलंबून आहेत. मात्र, या आगारातील बर्याच बसेस जुन्या आणि मोडकळीस आलेल्या खराब रस्त्यामुळे खिळखिळ्या झालेल्या आहेत. वारंवार यामध्ये बिघाड होत असतो. परिणामी प्रवाशांना एसटी बसमध्ये बिघाड झाल्यास तासंतास दुसरी बस येईपर्यंत ताटकळत उभे राहावे लागत असल्याने प्रवाशांना नादुरुस्त एसटीचा नाहक ताप होत आहे. जव्हार आगारातील एस.टी. बसची दररोज तांत्रिक दुरुस्ती व पाहणी केली जात नसल्याचे सत्य समोर आले आहे. जव्हार एस.टी. आगारात एकूण 54 मॅकेनिकपदे मंजूर असून त्यापैकी प्रत्यक्ष 30 मॅकेनिक कार्यरत असून 24 पदे रिक्त आहेत. ही पदे भरणे गरजेचे असताना परिवहन मंत्र्यांनी एस.टी. महामंडळाकडे दुर्लक्ष केले आहे.
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असे ब्रीद घेऊन प्रवाशांच्या सेवेत उतरलेल्या एसटी महामंडळाच्या अनेक बसगाड्यांची सध्या मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाल्याचे दिसते. जव्हार तालुक्यात दररोज रस्त्यात बस बंद पडून प्रवाशांचे हाल होत असलेले पहायला मिळत आहे. काही बसगाड्यांमधील आसन व्यवस्था पूर्णपणे कालबाह्य झाली असून, अनेक गाड्यांच्या खिडक्या तुटून काचा गायब झालेल्या आहेत. गाड्यांचे पत्रेही फाटलेले असल्याने प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचेपर्यंत वेगवेगळे आवाज ऐकून घ्यावे लागत आहेत. बहुतांश लांब पल्ल्याच्या काही बसगाड्यांची अवस्थादेखील बिकट आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात धावणार्या बसगाड्यांतून प्रवाशांना अगदी नाईलाजास्तव प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांकडून चांगले उत्पन्न मिळत असतानाही ग्रामीण भागात चांगल्या बसगाड्यांमधून सेवा देण्यात मात्र कमी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महामंडळ दरवर्षी भाडेवाढ करीत असते. त्यामानाने प्रवाशांना सुविधा देण्याकडे कानाडोळा केला जातो. यामुळे प्रवाशांचा प्रवासदेखील धोक्यात आला आहे. दररोज किमान एक ते दोन बस प्रवासादरम्यान मध्यरस्त्यावर बंद पडत असतात. याचा नाहक त्रास प्रवाशांनाच सहन करावा लागतो. जव्हार एस.टी. आगारात मॅकेनिक कमी असल्यामुळे बसची दुरुस्ती आणि तपासणी दररोज न करता महामंडळ प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहे. यामुळे जव्हार आगाराने प्रवाशांसाठी सुस्थितीतील बसगाड्या उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
– अझर अस्लम फरास, उपशहर प्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)