अनेक वर्षे डागडुजी न झाल्याने रस्ता खड्डेमय
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील माझेरी रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. साळाव-आगरदांडा रस्त्याला मुहूर्त मिळाला असून, त्यामुळे माझेरी रस्त्याला मुहूर्त कधी, असा प्रश्न विचारला जात आहे.
मुरुड-आगरदांडा व रोहाला जाण्यासाठी माझेरी रस्ता हा जवळचा असल्याने या मार्गे अनेक गाड्या रोजच्या रोज ये-जा करीत असतात; परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. हा रस्ता जागोजागी खड्डेमय झाल्याने लोकांना व वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता डोंगरीवरून माझेरी ते खोकरीपर्यंत खराब झाला आहे. निदान रस्त्याला पडलेले खड्डे तरी बुजवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
सदरचा रस्ता खड्डेमय असूनसुद्धा लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. तरी या रस्त्याला कोणी वाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामस्थ नवाब कुरेशी यांनी सांगितले की, हा रस्ता नव्याने बनला नाही. डोंगरी रस्त्यापासून माझेरी व खोकरी या बाहेरील रस्त्यावर जागोजागी अनेक खड्डे पडले आहेत. जी परिस्थिती साळाव-आगरदांडा रस्त्याची होती, तीच या रस्त्याची आहे. साळाव-आगरदांडा रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. आता लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे लक्ष देऊन हा रस्ताही खड्डेमुक्त करावा, अशी मागणी नवाब कुरेशी यांनी केली आहे.