मांडला पूलाची दुरावस्था : प्रशासन काशिद पूल घटनेच्या पुनरावृत्तीची वाट बघत आहे काय ?

कोर्लई | राजीव नेवासेकर |

पावसाळा सुरु होऊन महिना होतो न होतो तोच मुरुड तालुक्यातील बोर्ली-मांडला पंचक्रोशीतील मांडला ते काकळघर रस्त्याची पार दुरावस्था झालेली असून मांडला पूलाची दुरावस्था पाहाता प्रशासन काशिद पूल घटनेच्या पुनरावृत्तीची वाट बघतेय काय?असा सवाल नागरिकांतून विचारला जात असून याकडे संबंधित बांधकाम खात्याच्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अलिबाग-मुरुड रस्त्यावर मांडला ते काकळघर या अंदाजे पाच कि.मी. रस्त्याची गेल्या दोन तीन वर्षापासून पार दुरावस्था झालेली असून जागोजागी खाच-खळगे व खड्डे पडल्यामुळे वाहनचालक व ये-जा करणा-यांना त्रास व हाल सहन करावे लागत आहेत. मांडल्या पासुन गावात जाणा-या पूलाची दयनीय अवस्था असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मागील वर्षी हा पूल कमकुवत झाल्याने पुलावरील अवजड वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे याभागातील अनेक वाहन चालकांना आपली वाहने चालवण्यात कसरत करावी लागते आहे तर काहींना अपघाताला सामोरे जावे लागले आहे.मांडल्या पासून म्हाळुंगे कडे जाताना नदी लगतच्या रस्त्याची पार दुरावस्था झालेली असून याठिकाणी दुरुस्ती बरोबरच रस्त्याची उंची वाढविणे अत्यंत गरजेचे आहे.याबाबत मांडला ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता सुरेश पालवणकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने संबंधित अधिकारी वर्गाला वेळोवेळी निवेदने देण्यात येऊन मागणी करण्यात आली आहे.

शासनाच्या तसेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने यात लक्ष पुरवून मांडला ते काकळघर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी पंचक्रोशीतीतून होत असून मांडला पूलाची दुरावस्था पाहाता तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक असून प्रशासन काशिद पूल घटनेच्या पुनरावृत्तीची वाट बघतेय काय?असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.

Exit mobile version