मुरुड-केळघर रस्त्याची दैना

बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

| मुरुड | वार्ताहर |

मुरुड व रोहा या दोन तालुक्यांना जोडणारा सर्वात नजीकचा रस्ता गारंबी-केळघर मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडून काही ठिकाणी रस्ते वाहून, मोर्‍या खचून पार दैना झाली आहे. या उखडलेल्या रस्त्यामुळे येथून जाणार येणार्‍या वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे. गेले कित्येक वर्षे हा रस्ता होत नसल्याने बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

मुरुड गारंबी पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी शनिवारी व रविवारी विकेंडसाठी पर्यटक येत असतात. हे ठिकाण मुंबई, पुणे यामार्गे मुरुडला येणार्‍या पर्यटकांना सोयीचे असल्याने या मार्गावर रहदारी वाढली आहे. स्थानिकांना या मार्गाने मुरुड-रोहा-मुरुड असा प्रवास सोयीस्कर पडत आहे. परंतु या मार्गावर अरुंद रस्ते, अवघं वळणं व घाट रस्ता आहे. त्यामुळे वाहन चालकांना सावधगिरी बाळगावी लागते.

या मुरुड-गारंबी-केळघर रस्त्यावरील खड्डे, ठिकठिकाणी खचलेल्या मोर्‍या असल्याने वाहन चालविणे धोकादायक बनले आहे. तरी शासनाच्या संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी लवकरात लवकर खड्डे बुजवून घ्यावीत जेणेकरून वाहनांचे संभाव्य अपघात होण्याची शक्यता कमी होईल, अशी मागणी जनमानसातून जोर धरत आहे.

Exit mobile version