| रेवदंडा | वार्ताहर |
चौल येथील रामेश्वरनजीक मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून, हा रस्ता धोकादायक व अपघातास निमत्रंण ठरत आहे. रामेश्वरनजीक पोहा मिलजवळील मुख्य रस्त्याचा काही भाग डांबर वाहून गेल्याने खडबडीत व खोलगट खड्डा तयार झाला आहे. या रस्त्यात अनेकदा मोटारसायकल, रिक्षा, मिनिडोअर आदी वाहनांचा अपघात झाला आहे. या रस्त्यात मोटारसायकलस्वार तर पडण्याची एक आगळीवेगळी स्पर्धा लागली असल्याचे येथील स्थानिक दुकानदारांनी सांगितले. या अपघातात अनेक मोटारसायकलस्वार पडून जखमी झाले आहेत.
या दुरवस्था झालेल्या रस्त्याच्या कडेला कठडे नसलेली मोरी असून, वाहने हा रस्ता चुकविताना या मोरीत पडून गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. तरी, संबंधित विभागाने या रस्त्याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक प्रवासी करत आहेत.