कळंबोलीतील रस्त्यांची चाळण
| पनवेल | वार्ताहर |
गणरायाचे आगमन दोन दिवसावर येऊन ठेपल आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश भक्तांची लगबग सुरु आहे. मात्र, कळंबोली वसाहतीमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यामुळे विघ्नहर्त्या पुढेच खड्ड्याचे विघ्न निर्माण झाले असून, यंदा वसाहतीमधील बाप्पाचं आगमन खड्डेमय रस्त्यावरून होणार आहे. कळंबोली वसाहतीमधील प्रमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम पालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. त्याचसोबत सांडपाणी वाहिन्यांचे कामदेखील सुरु करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी सुरु करण्यात आलेले हे काम गणेशउत्सवापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही हे काम पूर्ण झालेले नसून, अर्धवट स्वरूपात करण्यात आलेल्या या कामामुळे वसाहतीलमधील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. बंद ठेवण्यात आलेल्या या रस्त्यामुळे एकाच मार्गांवरून वाहनांची वाहतूक होत असल्याने एकेरी मार्गांवर वाहतुकीचा ताण पडून रस्त्यांची चाळण झाली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी या मार्गावरील खड्डे बुजविण्याचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला; परंतु अवघ्या काही तासांत या कामाचे पितळ उघडे पडले. कळंबोली वसाहतीत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून मोठ्या उंचीच्या गणेश मूर्तिची स्थापना करण्यात येत असते. रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेमुळे काही ठिकाणी एकच मार्गीक उपलब्ध असल्याने विसर्जनादिवशी वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस आणि गणेश भक्त यांची मोठी तारांबळ उडण्याची शक्यता आहे.
मागील काही वर्षांत आकर्षक व मोठ्या गणेशमूर्तींवर मंडळांनी भर दिला आहे. काही गणेशोत्सवाला 30 ते 40 वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीअगोदर थाटामाटात श्रींची मूर्ती आणली जाते. यावर्षी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गणेशमूर्ती आणताना मंडळांची तारांबळ उडाली. काही मंडळांच्या गणेशमूर्ती आदल्या दिवशी आणल्या जातात. खडतर रस्त्यातून मंगलमूर्ती आणण्याचे चिंताजनक आव्हान गणेशमंडळांसमोर उभे ठाकले आहे.
विसर्जन तलावाच्या मार्गांवर तातपूर्ती डागडुजी
रोडपाली येथील तलावात कळंबोली वसाहतीमधील गणेश मूर्तिचे विसर्जन केले जाते. विसर्जन तलाव ते शिव-पनवेल महमार्गापर्यत असलेल्या रस्त्याच्या डागडुजीचे काम सध्या सुरु आहे. मात्र हे काम अर्धवट स्वरूपात असून, पालिकेच्यावतीने मार्गांवरील खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे.