| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील कशेळे खांडस रस्त्यावरील नांदगाव फाटा ते नांदगाव या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ किशोर हिले यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्र लिहून या भागाची समस्या मांडली आहे. साधारण चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहनचालक या रस्त्याने प्रवास करताना त्रस्त झाले आहेत.
तालुक्याच्या आदिवासी भागातील कशेळे खांडस रस्त्यावरून नांदगावकडे जाणारा रस्ता आहे. त्या नांदगाव फाटा ते नांदगाव या चार किलोमीटरचे रस्त्यातील अनेक भागात रस्ता नादुरूस्त झाला आहे. या रस्त्याने नांदगांव, चाफेवाडी, बलिवरे, चई, चेवणे, मोहपाडा, ऐनाचीवाडी सह मुरबाड तालुक्यात जाणारे वाहनचालक हे या रस्त्याचा वापर करतात. मात्र या रस्त्यावरील खड्डे आहेत त्याच स्थितीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातिल सर्वसामान्य जनता,आजारी रुग्ण, शालेय विदयार्थी गरोदरस्त्रियांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी पावसाळ्यापूर्वी सदरचे रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करणेत यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ हिले यांनी केली होती. मात्र यावर्षीचा अर्धा पावसाळा संपला तरी रस्त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली नाही.
पोशीर रस्ता दोन महिन्यात खड्डयात
कर्जत तालुक्यातील माथेरान नेरळ कळंब या राज्यमार्ग रस्त्यावरील पोशीर भागातील रस्त्याची डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने 20 ते 25 मे या कालावधीत पूर्ण केले होते. मात्र त्या रस्त्यावरील डांबर पावसाच्या पाण्याने निघून गेले आहे. दरम्यान, दोन महिन्यात रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने आणि उखडून गेलेल्या रस्त्याची चौकशी शासनाने करावी अशी मागणी पोशीर ग्रामपंचायतमधील उप सरपंच सचिन यशवंत राणे यांनी केली आहे.
पोशीर गाव ते पोही फाटा या दरम्यानच्या तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. या रस्त्यावर मे 2023 डांबरीकरण करण्यात आले. त्यात त्यावेळी रस्त्यावर बीबीएम डांबरीकरण न करता थेट कार्पेट डांबरीकरण करण्यात आले. या कालावधीत अवकाळी पाऊस देखील सुरु होता. त्या पावसात रस्त्याचे काम केल्याने रस्ता धुवून जाणार हे जवळपास नक्की होते तरी देखील तो रस्ता बनविण्यात आला होता. त्यामुळे रस्त्यावर करोडो रुपये खर्च वाया गेला आहे. तरी पावसाळा संपल्यावर रस्त्याची दुरुस्ती होणार कि पुन्हा रस्ता नव्याने बनविला जाणार याकडे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि स्थानिकांचे लक्ष लागून राहिले आहे.