चिखलातून करावा लागतोय प्रवास; नागरिकांसह प्रवासी, विद्यार्थ्यांचे हाल
| अलिबाग | प्रतिनिधी |
रुंदीकरणाच्या नावाखाली साळाव ते चोरढेपर्यंतचा रस्ता पावसाळ्यापुर्वी खोदून ठेवला होता. मात्र, योग्य पध्दतीन काम न केल्याचा फटका या मार्गावरील प्रवाशांना ऐन पावसाळ्यात बसला आहे. साळाव ते ताडगांव हा डांबरी रस्ताच गायब झाला आहे. ठिकठिकाणी केलेल्या खोदकामामुळे चिखलातून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांसह विद्यार्थ्यांवर येत आहे. नागरिकांचे प्रचंड हाल झाले असून, हा रस्ता अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे.
मुरूड तालुक्यातील साळावपासून चोरढे पुढील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित होता. या रस्त्याचे डांबरीकरण केल्याने हा रस्ता वाहन चालविण्यास सुकर होता. रोहा- अलिबागमध्ये जाण्यासाठी येण्यासाठी या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. आता मात्र या रस्त्यावरील प्रवास नको अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. साळावपासून पुढील रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण व काँक्रीटीकरणाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य मुलभूत पायाभूत सुविधा महामंडळाकडे सोपविण्यात आली आहे. महामंडळाकडून या रस्त्याचे कामही सुरू झाले. रस्ता रुंद होणार असल्याने या मार्गावरील प्रवासी आनंदी झाले. मात्र त्यांच्या आनंदावर फार मोठे विरजण पडल्याचे चित्र आहे.
साळावपासून पुढील रस्त्याचे खोदकाम मे महिन्यात केले होते. मातीचा भरावही ठिकठिकाणी करण्यात आला. रस्त्याच्या बाजूला असलेली अनेक झाडे झुडूप काढण्यापासून ठिकठिकाणी मोऱ्या बांधण्यासाठी खोदकामही करण्यात आले. काही ठिकाणी जेसीबीच्या मदतीने भराव करण्यापासून खडी टाकून सपाटीकरण्याचा प्रयत्न केला. परंतु, कूर्म गतीने सुरू असलेल्या या कामाचा फटका रस्त्यालगत असलेल्या लहान मोठ्या व्यावसायिकांना बसला. बिर्ला मंदीर हे धार्मिकस्थळ म्हणून ओळखले जात असताना पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. सुट्टीच्या दिवशी पर्यटक या ठिकाण आवर्जून येतात. परंतु, साळाव, बिर्ला मंदीर, शिरगांव, ताडगाव, या भागात ठिकठिकाणी केलेल्या खोदकामामुळे वाहतूकीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.
एसटीसह अन्य वाहने या चिखलात रुततात. त्यामुळे वाहतूकीवर त्याचा फटका प्रचंड बसत आहे. विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जाताना अडचणी येत आहे. दुचाकी घसरून अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू झाला आहे. या पावसामुळे या रस्त्यावर चिखल तयार झाला आहे. त्यामुळे हा रस्ताच गायब झाल्याचे दिसून आले आहे. रुंदीकरणाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामाचा त्रास नागरिकांना प्रचंड होत आहे. नागरिकांसह येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजीचे सुर उमटत आहे.
ठेकेदाराकडून करोडो रुपये घेतल्याची चर्चा
साळावपासून पुढील रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण काँक्रीटीकरणाचे काम महाराष्ट्र रस्ते मुलभूत पायाभूत सुविधा मंडळामार्फत सूरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी एका लोकप्रतिनिधीने 37 कोटी रुपये घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे काम संथ गतीने सुरू असल्याचे बोलले जात आहे. एका भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधीचा फटका सर्वसामान्यांना का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आमदार करतात तरी काय?
अलिबाग, मुरूड रोहा विधानसभा मतदार संघातील मी आमदार आहे, असा दावा विद्यमान आमदार वेगवेगळ्या भाषणासह वेगवेगळ्या कार्यक्रम, बैठकीतून करीत असल्याची चर्चा आहे. मात्र साळावपासून पुढील रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल जनतेमधून विचारला जात आहे. रस्त्याचा विषय येताच आमदार कुठे गायब होतात, असा प्रश्न विचारला जात आहे. तर अलिबाग-रोहा रस्ता स्वखर्चाने करेन, असे सांगणारे आमदार आता गेले कुठे? अशा वेगवेगळ्या प्रकारची चर्चा जोर धरत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेबाबत विचारणा केली असता गेलेल्या लोकांना मतपेटीत मते मिळाली नसल्याचे सांगून रस्त्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. परिणामी, आमदारांच्या या भूमिकेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.






