अवकाळी पावसातच महामार्गाची दुरवस्था

रस्त्यावरील साईडपट्टयांची धूप, अपघाताचा धोका वाढला

। कोलाड । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाचा निकृष्ट दर्जा समोर आला आहे. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम पुर्ण झाले आहे, त्या रस्त्याच्या बाजूच्या साईडपट्टयांचे काम निकृष्ट असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. अवकाळी पडलेल्या पावसात या साईडपट्टयांची झालेली धूप पाहता पावसाळ्यात या रस्त्याची काय अवस्था होईल, याबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम जवळपास गेल्या पंधरा वर्षांपासून सुरु आहे. सरकारने अनेकदा आश्‍वासने दिली, परंतु रस्त्याचे काम पुर्ण होईना. सुरवातीला काही वर्षे खडीमिश्रित डांबर टाकून काम करण्यात आले. यामध्ये शासनाच्या तिजोरीतुन करोडो रुपये वाया गेले. नंतर गेल्या वर्षी सिमेंट काँक्रिटचा रस्ता बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. काही ठिकाणचा रस्ता पुर्ण झाला आहे. मात्र साईडपट्टयांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे.


यावर्षी मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम डिसेंबर 2023 अखेर पुर्ण करण्यात येईल, असे लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आले. त्यानंतर डिसेंबर महिना संपताच मे अखेर पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. केवळ तारीख पे तारीख देण्यात आली. सध्या या मार्गावरील नदीवरील पुलाचे व मोर्‍यांचे कामही अपूर्ण तर काही पुलाच्या बांधकामाला सुरुवात ही केली नाही. त्यामुळे यावर्षी महामार्ग होण्याचे स्वप्नही अधूरेच राहणार असल्याचे मत कोकणवासियांनी व्यक्त केले आहे.

ज्या ठिकाणचे सिमेंट काँक्रिटचे काम पूर्ण झाले आहे. त्या ठिकाणची रस्त्यावर असणारी सिमेंटची धुळ व काही ठिकाणी साईडला टाकलेले मातीचे ढिगारे तसेच असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे अपघातात वाढ होत असून धुळीमुळे आजारातही वाढ होत आहे. त्यामुळे प्रवासी, रहिवासी नागरिक पूर्णपणे हैराण झाले असुन याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version