अवघ्या सहा महिन्यातच रस्त्याची दुरवस्था

Exif_JPEG_420

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील खोरा बंदर अंतर्गत ते जेट्टीपर्यंत रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, त्या कामाची चौकशीची मागणी व सदर स्ट्रक्चरल ऑडिट करुन अहवालाची प्रत मिळावी, याकरिता मुरुड तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी केली आहे.

मुरुड खोरा बंदर येथील मुख्य रस्त्यापासून ते खोरा बंदर कार्यालय इथपर्यंत अंतर्गत रस्त्याचे काम, तसेच जेट्टी परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांकरिता शासनाने करोडो रुपये खर्च करुन ठेकेदाराकडून काम पूर्ण करुन घेतले. परंतु हे काम सहा महिनेही टिकू शकले नाही. रस्त्यामधून सिमेंटचा भुसा, दगडे बाहेर येऊन पूर्णतः धुपून गेला आणि पुन्हा रस्त्याची दुरवस्था झाली. सदर कामाची वस्तुस्थिती पाहता संबंधित ठेकेदारानी फक्त पैसे लाटण्याच्या उद्देशाने हे काम केलेले आहे. सदरचे काम हे अत्यंत निकृष्टय दर्जाचे झालेले असून, रस्त्यावरून चालत असताना बाजूने एखादी बाईक जरी गेली तरी रस्ता वरचा सिमेंटचा भुसा हा अतिशय वेगाने उडून नाका, तोंडात जात आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे.आता रस्त्यावर पाणी भरलेले खड्डेच खड्डे पाहायला मिळतील. पुढील महिन्यापासून पर्यटक येण्याची सुरुवात होणार आहे. आणि याच रस्त्याच्या खड्ड्यांतून पर्यटकांना प्रवास करावा लागणार आहे.

तरी शाससनाच्या करोडो रुपयांचे नुकसान करणाऱ्या ठेकेदार व त्यांना सहकार्य करणारे अधिकारी यांची चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी व ठेकेदराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी श्रीकांत सुर्वे यांनी निवेदनद्वारे केली आहे. त्याची प्रत बंदर आणि खणिकर्म मंत्री दादाजी भुसे, जिल्हाधिकारी रायगड, मुख्य बंदर अधिकारी, प्रादेशिक बंदर अधिकारी, बंदर निरीक्षक खोराबंदर यांच्याकडे सादर केली आहे.

Exit mobile version