विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जिवाला धोका
| कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा हायवेवरून कोलाड हायस्कूलकडे जाणार्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्याने जाणार्या विद्यार्थी, तसेच नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या मार्गाने दुचाकीवरून जाणारा ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी रस्त्यावरील खड्ड्यात पडला; परंतु सुदैवाने तो किरकोळ जखमी झाल्याने बचावला.
या रस्त्यावर प्राथमिक मराठी शाळा, कै. द.ग. तटकरे माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज, तसेच आजूबाजूला वस्ती असून, याच मार्गाने धाटाव औद्योगिक क्षेत्रात काम करणारे असंख्य कामगार, विद्यार्थी व रहिवासी प्रवास करतात. परंतु, रस्त्यावर असणारी पाईप लाईन तुटून या रस्त्यावर पाणी साचले आहे. यामुळे रस्त्याला खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे रस्त्यात असणारा खड्डा दिसत नाही. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हा रस्ता टाटा पॉवर मालकीचा असून, येथून रेल्वे लाईन सुरु होती. नंतर येथे प्राथमिक शाळा तसेच कोलाड हायस्कूल व जुनिअर कॉलेज झाल्यानंतर हा रस्ता बनविण्यात आला. परंतु, कोण रस्त्याचे काम करतो, तर कोण हाच रस्ता खोदून पाण्याची पाईपलाईन टाकत आहे, तर कोण रस्ता खोदून केबल टाकत आहे. परिणामी, रस्त्याची वाट बिकट होत आहे. याचा नाहक त्रास या रस्त्यावरून जाणार्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना भोगावा लागत आहे. यामुळे या रस्त्याचे काम लवकरच लवकर केले जावे अन्यथा एखाद्या नागरिकला मोठा अपघात झाला तर होणार्या परिणामाला सामोरे जावे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.