। उरण । वार्ताहर ।
उरण तहसील कार्यालयाजवळील शौचालयाची भयानक दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी तसेच कार्यालयात ये-जा करणार्या नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यात सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने पावसाळ्यात रोगराई पसरण्याचा संभव असल्याची भिती चक्क शासकीय अधिकारी वर्गच व्यक्त करत आहेत. तरी या शौचालयाची स्वच्छता व दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करण्यात यावेत, अशी मागणी नागरीक व्यक्त करत आहेत.
उरण तहसील, पोलीस ठाणे व संबंधित शासकीय कार्यालयात कर्मचारी तसेच ये-जा करणार्या नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी शासकीय निधीतून उरण तहसील कार्यालयाजवळ सुसज्ज पुरुष व महिलांसाठी शौचालयाची उभारणी करण्यात आली होती. मागील वर्षभरापासून या स्वच्छता गृहांच्या स्वच्छतेकडे उरण तहसील व पोलीस वर्गाने तसेच उरण नगर पालिकेकडून दुर्लक्ष होत आहे. यामुळे सध्या या शौचालयांची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. पाण्याची व्यवस्था नसल्याने दुर्गंधी पसरली असून शौचालयाचा वापर करणे कठीण झाल्याने अनेक नागरिक नाहिलाजाने उघड्यावर शौचाला जावे लागत आहे. मात्र, महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तरी उरण तहसील व पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच उरण नगर पालिकेने शौचालयांची स्वच्छता व दुरुस्तीचे काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सर्व सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.






