जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दुर्गंधी

रुग्णांसह कर्मचारी, नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात
ठेकेदारासह, सार्वजनिक बांधकाम व रुग्ण प्रशासनाकडे समन्वयाचा अभाव
| अलिबाग | प्रमोद जाधव |
गाजावाजा करीत नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. बालरोग कक्षापासून संपूर्ण इमारतीच्या परिसराला सांडपाण्याने विळखा घातला आहे. दुर्र्गंधीमुळेे रुग्णांसह, कर्मचारी व नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. स्वच्छता करणाऱ्या एजन्सीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभाग, रुग्ण प्रशासन व नगरपरिषद प्रशासनाच्या समन्वयाचा फटका या सर्वांना बसत आहे.

अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील इमारत चाळीस वर्षापूर्वी बांधण्यात आली. 250 खाटांच्या इमारतीमध्ये बाह्य रुग्ण कक्षामार्फत सुमारे आठशेपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी केली जाते. रुग्णांना चांगली सेवा मिळावी. परिसर स्वच्छ रहावा यासाठी गेल्या काही वर्षापासून स्वच्छता राखण्यासाठी कंत्राटी कामगार नेमण्यात आले आहेत.

नागपूर येथील मे न्यू. ज्वाला सेक्युरिटी फोर्स या एजन्सीमार्फत रुग्णालयाची स्वच्छता राखली जाते. 12 कामगार या ठिकाणी काम करतात.सकाळी आठ ते दुपारी दोन या सहा तासात स्क्वेअर फुटावर ते काम करतात. मात्र जिल्हा रुग्णालयातील बाह्य कक्षाच्या इमारतीवर ठिकठिकाणी झाडे उगविली आहेत. दुरुस्त केलेेले पाईप लिकेज झाले आहेत. त्यामुळे सांडपाणी गळती वाढली आहे. ज्या इमारतीमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्या इमारतीच्या डाव्या बाजूला सांडपाण्यामुळे तळे निर्माण झाले आहे. बाजूला असलेल्या बालरुग्ण कक्षात नाक दाबून ये – जा करावी लागत आहे. सांडपाण्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत संबंधित ठेकेदाराला विचारणा केल्यावर ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे, तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासनाकडे विचारणा केल्यावर ठेकेदाराकडे बोट दाखविले जात आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपरिषदेवर ढकलत आहे. सांडपाणी जाण्याचा मार्ग नगरपरिषदेने बंद केल्याचा आरोप होत असताना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकच कचरा करतात असे एकमेकांवर ढकलण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य रुग्णांसह त्यांचे नातेवाईक व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना बसत आहे.

कपडे सुकविण्याची मशीन बंद
जिल्हा रुग्णालयात दर दिवशी दीडशेहून अधिक कपडे धुतले जातात. त्यानंतर ते मशीनद्वारे सुकविण्याचे काम केले जाते. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून कपडे सुकविण्याची मशीन बंद पडली आहे. त्यामुळे कपडे सुकविण्यासाठी गवतावर सुकविण्याची वेळ तेथील कर्मचाऱ्यावर आली आहे. या परिसरात गवत वाढला असून कचरा ठिकठिकाणी पडल्याने स्वच्छतेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नाही. पुर्वी ही व्यवस्था होती. परंतु नगरपरिषदेने तो मार्ग बंद केला आहे. रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या सांडपाण्याची पहाणी करण्यात आली आहे. त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याबाबत नगरपरिषद प्रशासनाकडेही चर्चा केली आहे.

विशाल देवकर – उपअभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग

नियमीत साफ सफाई सुरु असते. रुग्णालयाच्या बाहेरची स्वच्छता राखली जाते. आतील स्वच्छता राखण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. तरीदेखील कर्मचारी त्याठिकाणी पाहणी करण्यात आली आहे.

अंगाई साळुंखे – मुख्याधिकारी तथा प्रशासक, अलिबाग नगरपरिषद
Exit mobile version