मुंबईचं हवामान बिघडलं

वातावरणात अनपेक्षित बदल
हवेचा दर्जा घसरला; तापमानातही वाढ
। मुंबई । वृत्तसंस्था ।
एकीकडे देशाच्या राजधानी दिल्लीवर वायूप्रदुषणाचे संकट घोंगावत असतानाच, दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या वातावरणातील अनपेक्षित बदल नोंदविला गेला आहे. या बदलामध्ये मुंबईच्या हवेचा दर्जा एककी घसरला असून, तापमान वाढ सुद्धा घडली आहे.
हिवाळ्यात थंड, निरोगी हवेमुळे वातावरण आरोग्यदायी ठरते. मात्र मुंबईत सध्या काहीचे विपरीत चित्र पहायला मिळत आहे. मुंबईत दिवसाच्या तापमानात अचानक वाढ झालेली दिसून येत आहे. दिवसाचे तापमान 35.2 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. अचानक वाढलेल्या तापमानासोबतच मुंबईच्या हवेची गुणवत्ताही घसरल्याचे दिसून येत आहे. रविवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता 245 एक्यूआय एवढी नोंदवण्यात आली. मुंबईत दिवाळीच्या दिवसांमध्येही एवढी हवेची गुणवत्ता घसरली नव्हती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेची गुणवत्ता 164 एक्यूआय आणि पाडव्याच्या दिवळी 221 एक्यूआय एवढी नोंदवण्यात आली होती.
मागील काही दिवसांमध्ये मुंबईतील किमान तापमान 20 अंश सेल्सियसच्या खाली गेले होते. मुंबईत हिवाळ्याची सुरुवात झाल्याची जाणीवही झाली होती. मात्र रविवारी किमान आणि कमाल तापमानात अचानक वाढ झाली. सोमवारी शहराचे कमाल तापमान 32.8 अंश सेल्सियस आणि उपनगराचे तापमान 35.2 अंश सेल्सियस एवढे नोंदवण्यात आले. तर शहराचे किमान तापमान 25 अंश सेल्सियस आणि उपनगराचे तापमान 24.4 अंश सेल्सियस एवढे नोंदवण्यात आले.

हवामानातील बदलांचे आकलन करणारी संस्था स्कायमेटमधील हवामान तज्ज्ञांच्या मते, नैऋत्येकडून उष्ण हवेचे प्रवाह सुरु झाले आहेत. त्यामुळे शहरातील तापमानातही वाढ झाली आहे. आता 21 किंवा 22 नोव्हेंबरनंतरच तापमानात काहीशी घसरण पहायला मिळेल. तसेच कर्नाटकच्या किनारी भागात एक वादळसदृश स्थिती तयार होत असून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्राच्या किनारी भागात म्हणजेच मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात 18 ते 20 नोव्हेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे, असा अंदाज स्कायमेट संस्थेचे प्रमुख हवामान तज्ज्ञ महेश पालावत यांनी सांगितले.


कुलाब्यात सर्वाधिक वायुप्रदुषण
कुलाब्यात सर्वाधिक 345 एक्यूआय एवढी प्रदुषित हवा असल्याची नोंद झाली आहे. तर त्यानंतर माझगावमध्ये 325, बीकेसीमध्ये 314 आणि मालाडमध्ये हवेची गुणवत्ता 306 एक्युआय एवढी नोंदवण्यात आली आहे. हवेची ही गुणवत्ता सर्वात घातक गटातील आहे. तसेच अंधेरीमध्येही हवेची गुणवत्ता 259 एक्यूआय एवढी नोंदवण्यात आली आहे. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक जास्त असल्यास, अशी हवा आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे अस्थमा किंवा श्‍वासासंबंधी आजार असलेल्या रुग्णांनी जसेत लहान मुले व ज्येष्ठांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.

Exit mobile version