अवकाळीने वीटभट्टी व्यावसायिक धास्तावले

। तळा । वार्ताहर ।

अवकाळी पावसाने तळा तालुक्यातील वीटभट्टी व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. जूनच्या सुरुवातीला सुरू होणार्‍या पावसाने मे च्या सुरुवातीपासूनच येण्याचे संकेत दिल्याने वीटभट्टी व्यावसायिक धास्तावले आहेत. तळा तालुक्याचा विचार करता तालुक्यात 10 ते 15 वीटभट्टी व्यावसायिक आपला व्यवसाय करीत आहेत. मात्र तूस, माती, माणसांची वाढलेली मजुरी या सगळ्याच गोष्टींमध्ये आर्थिक घडी बसत नसल्याने वीटभट्टीचा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. अशातच रेतीची रॉयल्टी शासनाने बंद केल्याने तालुक्यातील रेती व्यवसाय बंद असून पर्यायी बरेच बांधकाम व्यावसायिक बांधकाम करण्यासाठी जांभा दगड व सिमेंटच्या ठोकळ्यांचा वापर करीत आहेत.अशातच एवढ्या अडचणी पार करून वीटभट्टीचा व्यवसाय केलाच तर अवकाळी पावसाचे संकट आवासून उभे राहत असल्याने. या वीट व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामध्ये फक्त वीट व्यवसायिकच नाही तर या व्यवसायावर अवलंबून असणारे आदिवासी बांधव जे या वीट व्यवसायातून आपले घर चालवतात त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे.

Exit mobile version