पुढील चार दिवस अवकाळीचा इशारा

| मुंबई | प्रतिनिधी |

उष्ण, दमट वातावरणात काहीसा बदल जाणवत असून, काही प्रमाणात उष्णता कमी झाली आहे. दरम्यान, पुढील 4 दिवस राज्यातील बहुतांशी भागात पावसाची अधिक शक्यता आहे. तसेच मंगळवारपर्यंत (दि.14) वादळी पावसाची शक्यता असल्याचेही भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मंगळवार 14 मेपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिह्यांमध्ये गारपीट होण्याची संभावनादेखील आहे. दरम्यान, 40-50 कि.मी. प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वारा वाहणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. महाराष्ट्रासह बिहार, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील पुणे येथे शनिवार 11 मे आणि रविवार 12 मे तर नांदेड, लातूर, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये रविवार 12 मे रोजी ऑरेंज अलर्ट असून, मुसळधार पावसाची अधिक शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Exit mobile version