। ठाणे । प्रतिनिधी ।
बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी एका स्कूल व्हॅनमध्ये चिमुरडीवर झालेल्या अत्याचारानंतर, आता पुन्हा एका शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर शहरातील एका नामांकित खासगी शाळेत ही विद्यार्थिनी शिक्षण घेते. शाळेतून घरी सोडत असताना बसमध्ये इतर विद्यार्थी कमी असताना किंवा ही विद्यार्थिनी एकटी असताना चालकाने तिची छेड काढली आणि विनयभंग केला. शालेय परिवहन नियमांनुसार बसमध्ये महिला मदतनीस असणे अनिवार्य आहे, मात्र या बसमध्ये कोणतीही महिला कर्मचारी नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडित विद्यार्थिनीने घरी गेल्यानंतर घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. संतापलेल्या पालकांनी तातडीने बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून बसचालकावर गुन्हा नोंदवला आहे. या घटनेने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.







