बागमांडला-बाणकोट पूल फास्ट ट्रॅकवर

जुन्या पुलाचे काम 12 वर्षांपासून अपूर्ण; त्रुटींमुळे कोट्यवधींचा खर्च वाया

। श्रीवर्धन । वार्ताहर ।

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणार्‍या बागमांडला ते बाणकोट पुलाचे काम नव्याने सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे 12 वर्षांपूर्वी केलेल्या कामावरील कोट्यवधींचा खर्च वाया गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारी नियोजनातील त्रुटींमुळे जनतेचा पैसा वाया जात असल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त होत आहे. बागमांडला ते बाणकोट पुलाचे काम सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळाले होते. 2012-13 मध्ये पुलासाठी 182 कोटींचा खर्च अपेक्षित होता. भविष्यात या खाडीतून मोठी जहाजे जातील, या कारणास्तव पुलाची उंची वाढवली व पुलाचा खर्च 450 कोटींवर गेला. प्रत्यक्षात खाडीतून मोठी जहाजे जातील, एवढी बाणकोटची लांबी, रुंदी आणि खोलीही नाही. दरम्यान, कंपनीने पुलाचे पिलर उभारून काम अपूर्णावस्थेत ठेवले आहे.

या कामावर किती खर्च झाला, कंत्राटदार कंपनीला किती पैसे दिले याबाबत अधिकार्‍यांना माहीत नाही. मात्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नवीन निविदा काढून अलीकडेच नवीन जागी पुलाचे काम सुरू केले आहे. 2012 मध्ये सुरू झालेले काम 2015 पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती.

बागमांडला ते बाणकोट पुलाचे भूमिपूजन 2012-13 मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते धूमधडाक्यात करण्यात आले होते. त्या वेळी राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार होते. भुजबळ हरेश्‍वर, बागमंडला येथे येणार म्हणून भरपावसात सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे डांबरीकरण केले होते. त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीत अवघ्या काही दिवसांत रस्ता पूर्णपणे उखडून गेला होता.

408 कोटींची प्रशासकीय मान्यता
नाशिकमधील अशोका बिल्डकॉन कंपनीला बागमांडला-बाणकोट पूल उभारण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. याठिकाणी केबल स्टे प्रकारतील पूल बांधण्यात येत आहे. पुलासाठी 408 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून तीन वर्षांत काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
घाटमाथ्यावरील प्रवास सुकर होणार
बागमांडला-बाणकोट पुलाचे काम नव्याने सुरू झाले आहे. जुन्या जागेपासून काही अंतरावरच हे काम सुरू आहे. घाटमाथ्यावरून कोकणात येणार्‍या पर्यटकांना गणपतीपुळेकडून श्रीवर्धन, हरिहरेश्‍वर, दिवेआगरकडे येण्यासाठी हा पूल महत्त्वाचा असेल. त्याचप्रमाणे पुण्यातून श्रीवर्धनला येणार्‍या पर्यटकांना गणपतीपुळे किंवा रत्नागिरीला जाण्या-येण्यासाठीही पूल उपयोगी ठरणार आहे. नव्याने होत असलेल्या बागमांडला-बाणकोट पुलाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे आहे.
Exit mobile version