। खांब । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील गावदेवी धानकान्हे यांच्या वतीने संपन्न करण्यात आलेल्या विभागीय कबड्डी स्पर्धेत गावदेवी बाहे संघाने सर्वोत्तम कामगिरी करून चषकावर आपले नाव कोरले.
गावदेवी क्रीडा मंडळ धानकान्हे व कोलाड कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने संपन्न करण्यात आलेल्या या कबड्डी स्पर्धेत गावदेवी बाहे संघाने सर्वोत्तम खेळ करून ही कामगिरी केली आहे. येथील उपसरपंच सूरज कचरे, सेवानिवृत्त सैनिक समीर साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भादावकर, पत्रकार श्याम लोखंडे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या या कबड्डी स्पर्धेप्रसंगी युवा उद्योजक नितिन कचरे, डॉ. हेमा भादावकर, उद्योजक नारायण कान्हेकर, समाजसेवक संदेश गायकवाड प्रदीप जाधव, घन:श्याम कराले, हेमंत खरिवले आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत जय बजरंग आंबेवाडी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर तृतीय व चतुर्थ क्र.अनुक्रमे वाघेश्वर देवकान्हे व नवतरूण सोनारसिद्ध धाटाव या संघांनी पटकावले. स्पर्धेत उत्कृष्ट पक्कड राज रटाटे, उत्कृष्ट चढाई प्रणिल करवडे, सामनावीर विशाल माटल तर पब्लिक हिरो म्हणून स्वप्नील भोईर यांना तसेच विजेत्यांना उपस्थित मान्यवरांचे हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गावदेवी धानकान्हे मंडळाचे सर्व सदस्य तसेच कोलाड असोसिएशन यांनी मोलाचे सहकार्य केले.







