धर्माधिकारी यांचे बनावट पत्र प्रसारीत करणार्‍या आरोपीला जामीन

| अलिबाग । विशेष प्रतिनिधी |

आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचे बनावट पत्र समाज माध्यमांवर प्रसारीत करणार्‍या आरोपीला आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. मात्र जामिनाची पूर्तता करू न शकल्याने त्याला आणखी एक दिवस कारागृहात काढण्याची वेळ ओढवली आहे. 

शनिवारी (दि.22) महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचे एक पत्र समाजमाध्यमांवर प्रसारीत झाले. या पत्रात यापुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका, असे आवाहन करण्यात आले होते. समाजमाध्यमांवर हे पत्र वेगाने प्रसारीत होण्यास सुरवात झाल्यामुळे खळबळ उडाली होती. याबाबत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सचिव संदीप पाटील यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम 500, 501, 505 (2), 505(3) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे 66 सी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे प्रकरण स्थानिक गुन्हे अन्वेषशण विभागाकडे वर्ग करण्यात आले. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी तपास सुरु केल्यानंतर पुणे येथून शुभम काळे या तरुणाला अटक करण्यात आली होती. त्याला अलिबाग न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. सदर मुदत आज पूर्ण झाल्यानंतर प्रथम वर्ग न्यायाधीश कोकाटे यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यावर आरोपीचे वकील ॲड. अजय उपाध्ये यांनी जामीन अर्ज सादर केला. सदर आरोपी स्थानिक नसल्याने रोख रकमेचा जामीन स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे स्थानिक पातळीवर जामीन करण्यात आला. मात्र कागदपत्रांच्या पूर्तता अभावी सदर जामिनाची पूर्तता होऊ न शकल्याने आणखी काही दिवस आरोपीला कारागृहात राहावे लागणार आहे.

Exit mobile version