| पेण | प्रतिनिधी |
मुद्रांक विक्रेता हबीब खोत यांच्याकडून 3 लाख रूपये व 40 हजार रूपये हप्त्याच्या खंडणीची मागणी करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह इतर दोघांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. पेण येथील माजी नगरसेवक हबीब खोत यांचा स्टॅम्पवेंडरचा व्यवसाय आहे. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर, रफिक तडवी, शालोम पेणकर यांनी हबीब खोत यांना मनसेच्या पेण कार्यालयात बोलवून 3 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. तडजोडीअंती 2 लाख रूपये रोख खंडणी व दर महिना 50 हजार रूपये हप्त्याची मागणी केली होती. खंडणी प्रकारणी संदीप ठाकूर याच्या हस्तकाला दीड लाख रूपये खंडणी घेताना पोलिसांनी अटक केली होती.
खंडणी प्रकरणातील आरोपींना प्रत्येकी 45 हजार रुपयांवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. खंडणी प्रकरणी आरोपींना जामीन मंजूर करताना कोर्टाने त्यांच्यावर कडक अटी घातल्या आहेत. खटल्यातील तथ्यांशी परिचित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रलोभन, धमकी किंवा वचन देणे, जेणेकरून तपासावर परिणाम होईल, असे कृत्य करू नये. तसेच तपास अधिकाऱ्याला तथ्ये उघड करण्यापासून परावृत्त करणे असे करू नये. आरोपींनी आठवडयातून दोन वेळा सोमवार व शुक्रवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत पोलीस स्टेशनला हजर राहून पोलिसांना तपासात सहकार्य करावे.
आरोपींनी न्यायालयाचा किंवा तपास यंत्रणेच्या परवानगीशिवाय पेण तालुक्या बाहेर जाउ नये. खंडणी स्वरूपाचा गुन्हा आरोपीने पुन्हा करू नये. वरील पैकी कोणत्याही प्रकारची अटीचे पालन आरोपींकडून न झाल्यास जामीन रद्द करण्यात येईल. या अटी शर्तीवर खंडणी प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरोपींना स्वत:चा पत्ता फोन नंबर व तीन रक्ताच्या नातेवाईकांच्या पत्त्यांसह त्यांच्या ओळखीचे पुरावे आणि संपर्क क्रमांक न्यायालयाला दयावे. आरोपींनी तक्रारदार हबीब खोत यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भेटू नये. पोलीस जेव्हा जेव्हा तपासाचे उद्देशाने बोलवतील तेव्हा तेव्हा आरोपींने हजर रहावे.