बालई,काळाधोंडा ग्रामस्थांचा भूसंपादनाला विरोध

| उरण | वार्ताहर |

उरणच्या बालई काळाधोंडा या विभागातील जमिनींचे भूसंपादन हे बेकायदेशीर असून सिडकोच्या या भू संपादनाच्या विरोधात आत्ता येथील स्थानिक भूमिपुत्रांनी दंड थोपटले आहे. बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेच्या वतीने प्रकल्प ग्रस्थांचे नेते राजाराम पाटील यांनी रायगड उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा भूसंपादन अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडे सिडको विरोधात निवेदन (तक्रार अर्ज ) सादर केले आहे.

सिडको 1973 च्या कालबाह्य शासन राजपत्रातील नोटिफिकेशन द्वारे उरणच्या जमिनीचे भूसंपादन करीत आहे. ही शेतकर्‍यांची थेट फसवणूक आहे. उरण येथील जमिनीवर नैसर्गिक लोकसंख्येनुसार वाढलेली विस्तारीत गावठाणात हजारो घरे आहेत. 1950 पासून नेव्ही ओनजीसी जेएनपीटी, एमएसीबी, सिडको, सेझ यांचे भूसंपादन झाले आहे. आता जमीन शिल्लक नाही. सर्व जमिनीवर मूळ उरणकर आगरी, कोळी, कराडी, माळी, चर्मकार, बौद्ध, मातंग, आदिवासी, बारा बलुतेदार, अल्पसंख्याक, मुस्लिम, ईस्ट इंडियन ख्रिश्‍चन आणि इतर भारतातून आलेल्या केंद्रीय कर्मचारी वर्गाची स्वतंत्र बंगले आणि टुमदार घरे आहेत.

सिडकोने अगोदर घरांसाठी घेतलेल्या मौल्यवान जागा रिलायन्स अंबानी सेझ प्रकल्पासाठी विकल्याने सिडको जमिनीसाठी दिवाळखोर झाली आहे. नवी मुंबई अदानी विमानतळ या खाजगी प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनींचे पुनर्वसन करण्यासाठी सिडकोकडे जमीन शिल्लक नाही. आज सुरू आहे ती फसवणूक म्हणूनच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली असल्याचे राजाराम पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version