बाळाराम पाटील पुन्हा आमदार होणार

शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष अभयंकर यांना विश्‍वास

| पनवेल | प्रतिनिधी |

शिक्षकांच्या प्रश्‍नांवर तळमळीने काम करणारे महाविकास आघाडीचे आणि पुरोगामी शिक्षक संघटना टीडीएफचे अधिकृत उमेदवार बाळाराम पाटील यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत पूर्ण पाठिंबा देत असून, त्यांना भरघोस मताने पुन्हा विधान परिषदेत पाठवणार, असे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मु.अभ्यंकर यांनी सांगितले. पनवेल येथे बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित शिक्षक संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, शिवसेना नेते बबन पाटील, काँग्रेसचे आर.सी. घरत, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, राष्ट्रवादीचे सतीश पाटील, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, पुरोगामी शिक्षक आघाडीचे अध्यक्ष भानुदास तुरुकमाने, मुंबई शिक्षक सेनेचे अध्यक्ष अजित चव्हाण, शेकापचे पनवेल तालुका चिटणीस नारायण घरत, पनवेल कृऊबा सभापती डॉ. दत्तात्रय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेकापचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी सांगितले की, येत्या 11 जानेवारीला आ. बाळाराम पाटील आपला निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. गेल्या वेळेस आपण तीनशे कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन बाळाराम पाटील यांना विजयी केले होते. भाजपची 36 वर्षांची मक्तेदारी मोडीत काढली होती. यावेळी पनवेलमधून तीन हजार मतांची आघाडी घेणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी सांगितले की, आ. बाळाराम पाटील हे शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेहमीच तत्पर असतात, विधिमंडळात आम्हा सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदारांना मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी केले आहे. शिक्षक बांधवांचे आणि भगिनींचे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा आमदार म्हणून विधान परिषद पाठवणे, ही काळाची गरज आहे. तेव्हा त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन सावंत यांनी शिक्षक मतदारांना केले.

यावेळी आपल्या मनोगतात प्रा. गणेश ठाकूर यांनी सांगितले की, दिवंगत एन.डी. पाटील सरांनंतर आम्ही रयत शिक्षण संस्थेच्या वतीने दुसरा आमदार म्हणून बाळाराम पाटील यांना विधान परिषदेत पाठवले आहे. त्यांनी भाजपची 36 वर्षांची परंपरा मोडीत काढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त कामोठे येथे चाळीस हजार फुटांची रांगोळी साकारण्यात 12 पाटील यशस्वी झाली आहेत. याशिवाय शिक्षकांच्या प्रश्‍नांची जाण असल्यामुळे आ. बाळाराम पाटील यांना मोठ्या फरकाने पहिल्या फेरीत विजयी करण्यासाठी आपण सार्‍यांनी सज्ज राहावं, असं आवाहन गणेश ठाकूर यांनी केलं.

शिक्षक संवाद मेळाव्यात शिक्षकांना संबोधित करताना आ. बाळाराम पाटील यांनी सांगितले की, शिक्षकांचे प्रश्‍न तसेच जुनी पेन्शन योजना, शिक्षकांची वाढीव पदे, शिक्षकांचे निवडश्रेणी यासाठी आपला शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे आणि याच कामासाठी मी कटीबद्ध आहे, अशी ग्वाही दिली.

सदर शिक्षक संवाद मेळाव्यासाठी 900 ते 1000 शिक्षक उपस्थित होते. यामध्ये महिला शिक्षकांची उपस्थिती उल्लेखनीय होती. सूत्रसंचालन हरीश मोकल यांनी केले.

बाळाराम पाटील हे शिक्षकांच्या मनात आहेत, त्यांनी पदाचा कोणताही गर्व केला नाही तसेच शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांचे पुन्हा एकदा विधान परिषदेत जाणे महत्त्वाचे आहे.

ज.मु. अभ्यंकर
शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष
Exit mobile version