| वाकणनाका | वार्ताहर |
महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा 720 कि.मी.पर्यंतचा असलेल्या कोकण शिक्षक मतदारसंघात विशेष असा दबदबा आहे. त्यांनी गेल्या सहा वर्षांत चांगले काम केले आहे. शिक्षकांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी आपण त्यांना दुसर्यांदा निवडणुकीसाठी उभे केले आहे. बाळाराम पाटील शिक्षकांच्या सर्व समस्यांना निश्चितच वाचा फोडतील, अशी ग्वाही माजी आ. पंडित पाटील यांनी दिली. बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ दि. 24 रोहा येथे कार्यकर्ते व शिक्षक मतदार यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला.
दरम्यान, माजी आ. पंडित पाटील यांच्यासोबत रोहा तालुका शिक्षक निरीक्षक मोहन कडू, स्वर्गीय दिनाभाई मोरे शिक्षण संस्थेचे चेअरमन तसेच माजी जि.प सदस्य नंदूशेठ म्हात्रे, आरडीसीसीचे संचालक गणेश मढवी, मेढा हायस्कूलचे चेअरमन लक्ष्मण महाले, घोसाळे हायस्कूलचे चेअरमन प्रकाश धुमाळ, कोएसो अलिबाग कार्यालयाचे विशेष अधिकारी अशोक गावडे, फेडरेशनचे सदस्य हेमंत ठाकूर, कृउबा समितीचे कर्मचारी सुबोध देशमुख, मंगेश ढमाल, रोहा तालुका पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नारायण पानसरे, कोकण एज्युकेशन सोसायटीचे मेहेंदळे हायस्कूल, घोसाळे हायस्कूल, मेढे हायस्कूल, डॉ. सी.डी. देशमुख महाविद्यालय तसेच पीएनपीचे तळाघर हायस्कूलच्या उपस्थित शिक्षक, रोहा विभागातील कोएसो विद्यालयांचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे ते म्हणाले की, आज शिक्षकांपुढे अनेक समस्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अपुरा इमारत निधी, शिक्षण सेवक पद, जुनी पेन्शन योजना, शिक्षकांची मान्यता, अपुरे शैक्षणिक साहित्य आदी समस्या सोडविण्यासाठी आपल्याला हक्काचा माणूस पाहिजे आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी आझाद मैदानावर केलेले आपणास ज्ञात आहे. आपल्या अनेक शाळांना त्यांनी शैक्षणिक साहित्याच्या रूपात प्रोजेक्ट, संगणक, प्रिंटर, भौमितिक पेटी, विज्ञान साहित्य, गुंडाळी फळे, नकाशे, अशा साहित्याचे वाटप केले. असे कार्य करणारे ते एकमेव आमदार आहेत.
शेवटी त्यांनी सांगितले की, कोएसोचे अध्यक्ष संजय पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यानुसार कोएसोचे शिक्षक आपापली बांधिलकी जपतीलच; परंतु पुढे ते म्हणाले, की मागील निवडणुकीदरम्यान सुज्ञ शिक्षकांचे सुमारे 1800 मतदान बाद झाले होते, ही खेदाची बाब आहे. त्यामुळे आता तरी सर्वांनी जागरुक होऊन मतदान करून आपले बहुमूल्य मत उमेदवार बाळाराम पाटील यांना देऊन भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन केले.
या प्रचार सभेच्या वेळी पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नारायण पानसरे यांनी शिक्षकांच्या वतीने शिक्षकांना भेडसवणार्या अडीअडचणी कोणत्या आहेत हे सांगून शिक्षकांनी मतदान कसे करावे, याविषयी माहिती तसेच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.