बाळाराम पाटील यांची भाजपवर टीका
| पनवेल | प्रतिनिधी |
राज्यात सध्या महानगरपालिकेच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक वर्षांनी या निवडणूका लागल्याने सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. परंतु, याचदरम्यान एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. यावेळी निवडणूक न लढता राज्यात तब्बल 67 नगरसेवक निवडून आले आहेत. धक्कादायक म्हणजे हे सर्व नगरसेवक महायुतीतील आहेत. त्यात पनवेलमध्ये देखील भाजपचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यावर शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत भाजपवर टीका केली आहे. भाजप पैशाचा वापर करून उमेदवारांना विकत घेत असून याचा बदला पनवेलची जनता घेईल, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे.
महानगरपालिका निवडणूक होऊन काही वर्षे झाली आहेत. त्यानंतरही पनवेलमध्ये भाजपच्या सात उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. पैशांचा वापर करून पनवेलची महायुती महाविकास आघाडीला घाबरवत असल्याचा आरोप शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केला आहे. पनवेलमध्ये भाजपचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात प्रभाग 18 ‘अ’मधून ममता म्हात्रे, प्रभाग 18 ‘ब’मधून नितिन पाटील, प्रभाग 18 ‘क’ मधून स्नेहल ढमाले पाटील , प्रभाग 19 ‘अ’मधून दर्शना भोईर, प्रभाग 19 ‘ब’मधून रुचिता लोंढे, प्रभाग 20 ‘अ’मधून अजय बहिरा व प्रियंका कांडपिळे अशी उमेदवारांची नावे आहेत. तसेच, पनवेल बिनविरोध निवडणून आलेल्या स्नेहल ढमाले पाटील या भाजपचे विधानपरिषद आमदार विक्रांत पाटील यांची बहीण आहेत. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेत एकूण 7 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. शेकाप देखील आक्रमक झाली आहे. दरम्यान, भाजपा महापालिकेच्या पैशांचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप बाळाराम पाटील यांनी केला आहे. तसेच, बिनविरोध घोषित झालेल्या ठिकाणी मतदान घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर प्रतिक्रीया देताना ते माध्यमांशी बोलत होते.
बिनविरोध नगरसेवकांवर आक्षेप
राज्यातील विविध महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, पनवेलसह इतर महापालिकांमध्ये एकूण 67 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने विरोधकांनी आक्षेप नोंदविला आहे. याची दखल निवडणूक आयोगाने घेतली असून या बिनविरोध निवडणूकीची माहिती राज्य निवडणूक आयोगाने संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मागितली आहे. उमेदवारांनी माघार केव्हा घेतली, त्यांनी दबावाचा काही आरोप केला आहे का, याची शहानिशा करून सविस्तर अहवाल आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला आहे.
मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध
मुंबई माहापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (दि.2) अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने तब्बल 67 ठिकाणी सत्ताधारी पक्षांचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात बाजपचे 45, शिंदे गटाचे 19, अजित पवार गटाचे 2 आणि अन्य एक नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.






