। पनवेल । प्रतिनिधी ।
तीनवेळा आमदार राहूनही नागरिकांना मुलभूत सोईसुविधा देण्यास आ. प्रशांत ठाकूर अपयशी ठरले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी होणार्या पनवेल विधानसभा निवडणूकीत भाजपाला शह देण्यासाठी शेकापचे नेते बाळाराम पाटील यांना पनवेल तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे बाळाराम पाटील यांची उमेदवारी आता अधिक बळकट झाली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बाळाराम पाटील यांना पक्षाचा पाठिंबा जाहिर केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी पाठिंब्याचे पत्र शुक्रवारी बाळाराम पाटील यांना दिले आहे.
तालुक्यातील अनेक विहारांमध्ये, सामाजिक संस्था, कार्यकर्त्यांनी बाळाराम पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे वंचितनेदेखील पाठिंबा द्यावी, अशी इच्छा पनवेलमधील आंबेडकरी अनुयायांची होती. वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी ही विनंती मान्य करून बाळाराम पाटील यांना पाठिंबा जाहिर केल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल प्रवक्ते महादेव वाघमारे यांनी ही माहिती दिली. पनवेलच्या नागरिकांनी 15 वर्षे पिळवणूक करणार्या भाजपाचा पराभव आता सहज शक्य असल्याचे वाघमारे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विश्वास व्यक्त केला. वंचितने पाठिंबा जाहिर केल्याबद्दल शेकाप आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी आभार व्यक्त करीत 20 नोव्हेंबर रोजी 7 क्रमांकाच्या समोरील शिट्टी या चिन्हासमोरील बटण दाबून आपले बहुमूल्य मत देण्याची विनंती केली आहे.