| संगमनेर | प्रतिनिधी |
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारादरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी उद्योगमंत्री उदय सामंत यांना व्यासपीठावरूनच फोन लावत एमआयडीसी मंजूर केल्याची ध्वनीफित ऐकवत, ते जिथे जातात तिथे एमआयडीसी मंजूर करतात. उद्या ते नद्या, डोंगरही मंजूर करतील. कालही संगमनेरमध्ये त्यांनी सगळेच मंजूर करून टाकले. सध्या त्यांची ‘अशी ही बनवाबनवी’ चालू असल्याची खिल्ली काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उडवली आहे.
संगमनेरच्या प्रचार सभेत बाळासाहेब थोरात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, निवडणुकीत आश्वासने द्यावी लागतात हे खरे असले तरी फसवी आश्वासन देणे योग्य नाही. पुणे-नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर मार्गेच जाणार होता, तसेच सर्वेक्षण होऊन जमिनीही ताब्यात घेतल्या गेल्या होत्या. मात्र, त्यात यांनी खोडा घातला. पुन्हा मूळ मार्गावरून रेल्वेमार्ग जावा यासाठी सत्यजित आणि मी भांडतो आहे. मात्र, ज्याने भांडायला हवे, तो मूग गिळून बसल्याचा टोला त्यांनी आमदार अमोल खताळ यांना लगावला. तसेच, गेल्या 30 वर्षाच्या कालखंडात नगरपालिका कायम विकासाच्या मार्गावर ठेवली. विरोधी नगरसेवकांनाही सोबत घेत एकमताने सर्व ठराव मंजूर झाले, हा इतिहास आहे. चांगले काम असल्यामुळे तर सत्ता नसतानाही 27 कोटी रुपयांची बक्षिसे नगरपालिकेला मिळाली आहेत. समृद्ध व्यापार, शांतता, सुव्यवस्था बंधुभाव यांनी नटलेले हे शहर आहे. सध्या शांतता बिघडत चालली असून कोणाचा हात तोडला जातोय, पोलीस ठाण्यात मारामाऱ्या होतात, नशेचा व्यापार करणारी ‘यांच्या’ व्यासपीठावरून भाषणे ठोकतात, हे नेमके कोणत्या दिशेला चालले आहे याचा विचार करायला हवा. शहराला बाधक असलेल्या या प्रवृत्तींपासून लोकांनी सावध राहिले पाहिजे. अन्यथा पुन्हा जुने दिवस येतील, अशा इशारा देतानाच समृद्ध शहरासाठी संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांना मतरूपी शाबासकी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.







