दमदार पावसाने बळीराजा सुखावला

जिल्हाभर समाधानकारक पाऊस

| खोपोली | वार्ताहर |

मागील आठ ते दहा दिवस गायब झालेल्या पावसामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता. शेतातील हाता तोंडाशी आलेले पीक पाण्यामुळे फुकट जाते की काय, अशी चिंता त्याला सतावत होती. मात्र, दहीहंडीच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या पावसाने आज मात्र खालापूर तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने चिंताग्रस्त झालेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण दिसू लागले आहेत.

यंदा पावसाने तशी उशिराने हजेरी लावली, त्यामुळे रोपांची उगवण व्यवस्थित झाली नाही. नंतर पावसाने पाठ फिरविल्याने उगवलेली रोपे सुकून गेली आणि उरलीसुरली रोपे जुलै महिन्यातील महापुरात कुजून गेली. त्यामुळे उरल्यासुरल्या रोपांनी अर्धेमुर्धे शेत लावलेल्या बळीराजाला रोप पसवण्याच्या वेळीसुद्धा पावसाने पाठ फिरविल्याने चिंता अधिक सतावत होती. मध्यंतरी आठ-दहा दिवस पावसाने पाठ फिरविल्याने चिंतातूर झालेल्या बळीराजाला गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसाने दिलासा दिल्याने तो सुखावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

श्रीवर्धन तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

| श्रीवर्धन | वार्ताहर |

जवळ जवळ महिनाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने श्रीवर्धन तालुक्यात सुखद गारवा जाणवत असल्याचे दिसत आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही तुरळक पाऊस झाला होता. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली होती. समुद्रदेखील शांत झाला होता. परंतु, दहीहंडीच्या मुहूर्तावर पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावलेली आहे. पाऊस थांबल्यानंतर कडक उन्हाळा जाणवत होता. उन्हाचे चटके प्रचंड जोरदारपणे जाणवत होते. शेतातील भातपीक करपून जाते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान, पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्यामुळे शेतकरीदेखील सुखावल्याचे पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रदेखील खवळलेला असून, त्यामुळेच पावसाला सुरुवात झाली आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील काही दिवस पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मुसळधार पावसाने मुरुडकरांना दिलासा

| कोर्लई | वार्ताहर |

दडी मारलेल्या पावसाचे गोपाळकाला दिनी पुनरागमन झाल्याने मुरुडकर आनंदित झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाऊस थांबल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट मुरूड तालुक्यावर घोंगावत होते. करपलेली भातशेती या पावसाने पुन्हा तरारून येईल असे दिसत नाही. मात्र, पावसामुळे उरलीसुरली भातशेती काही अंशी जीव धरू शकेल, असे मत शिघ्रे येथील शेतकरी रघुनाथ माळी यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता कायम आहे.

ऑगस्ट महिन्यात ऐन वेळी पावसाने दडी मारल्याने तालुक्यात भातशेतीला धोका पोहोचल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. खारआंबोली, शिघ्रे, नागशेत, उंडरगाव, जोसरांजन, जमृतखार, तेलवडे अशा अनेक पंचक्रोशीतील गावांतील शेतीला पाण्याअभावी भेगा पडल्याने पीक करपून गेले आहे. आता शेतकऱ्यांकडे पुन्हा पेरणीसाठी बियाणे नाही आणि पैसेदेखील नाहीत. पावसाचे पुनरागमन झाले असले तरी भातशेतीला त्याचा कितपत लाभ होईल हे येणारा काळ दाखवून देईल, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version