| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील दीड ते दोन हजार हेक्टर जमिनीवरील भातपिकांना लावणीनंतर 15 ते 20 दिवसांचा सलग पावसाचा खंड पडल्याने भातपिके संकटात आली होती. आता श्रावणातील तीन-चार दिवस पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आत्ता भातपिकांवरील किडीरोगाचा प्रादुर्भाव कमी होण्याला मदत होणार असल्याची माहिती कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील यांनी दिली. दरम्यान, बळीराजाच्या मेहनतीवर येणारे संकट टळणार असल्याने बळीराजा सुखावला आहे.
उरण तालुक्यात ऑगस्ट 2024 च्या तुलनेत आत्तापर्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे. मागील 15 दिवसांनंतर आत्ता पावसाने भातशेतीच्या पिकाला पूरक असा पाऊस होत आहे. यंदा शेतीच्या मशागतीचा फायदा बळीराजाला होणार असल्याचे चित्र भातशेतीच्या पिकावरून दिसत आहे. हिरवी गार झालेल्या भातशेतीने परिसर निसर्गरम्य दिसू लागला आहे. ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्याने काही ठिकाणची पिके करपू लागली होती. मात्र, आत्ता दोन-तीन दिवस जोरदार झालेल्या पावसामुळे शेतीवर हिरवा शालू पांघरलेला दिसू लागला आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
भातशेतीपूरक पावसाने बळीराजा सुखावला
