पुरूषांच्या प्रथम श्रेणीच्या संघांची उपांत्य फेरीत धडक
। मुंबई । प्रतिनिधी ।
बळीराम क्रीडा मंडळाच्या विद्यमाने काळाचौकी येथील आंबेवाडीतील बळीराम मंडळाच्या पटांगणावर 51 व्या कबड्डी महोत्सवानिमित्त कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जय भारत मंडळ, गुड मॉर्निंग स्पोर्ट्स, अमर क्रीडा व लायन्स स्पोर्ट्स यांनी पुरुष प्रथम श्रेणी गटाची उपांत्य फेरी गाठली आहे. जय भारत विरुद्ध गुड मॉर्निंग तर अमर क्रीडा मंडळ विरुद्ध लायन्स स्पोर्ट्स अशा उपांत्य लढती होणार आहेत.
दरम्यान, उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जय भारत मंडळाने दुर्गामाता स्पोर्ट्सला 34-11 असे सहज नमविले. आक्रमक सुरुवात करणार्या जय भारतने पहिल्या काही मिनिटातच लोण देत 11-01 अशी आघाडी घेतली. विश्रांतीला 19-08 अशी मोठी आघाडी जय भारतकडे होती. विश्रांतीनंतर आणखी एक लोण देत त्यांनी आपला विजय सोपा केला. निखिल पाटील, अविनाश कावीलकर यांच्या झंझावाती खेळाला या विजयाचे सारे श्रेय जाते. दुर्गामाताच्या रुपेश महावरेची या सामन्यात मात्रा चालली नाही. दुसर्या सामन्यात गुड मॉर्निंग स्पोर्ट्सने श्रीराम क्रीडा विश्वस्त संघाचा कडवा प्रतिकार 42-33 असा मोडून काढला. पहिल्या डावात लोण देत 21-12 आशी आघाडी घेणार्या गुड मॉर्निंगला दुसर्या डावात श्रीरामने चांगलेच झुंजविले. सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना श्रीरामाने लोण देत व गुण घेत ही आघाडी 33-38 अशी कमी करीत आणली. पण वेळेचे गणित साधता न आल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
तिसर्या सामन्यात अमर क्रीडा मंडळाने बंड्या मारुतीचे आव्हान 35-26 असे परतवून लावले. सावध व संयमी खेळ करीत मध्यांतराला 19-15 अशी आघाडी घेणार्या अमर संघाने नंतर देखील तोच पवित्रा अवलंबित विजय साकारला. करण सावर्डेकर, सिद्धेश जावरे यांच्या दमदार चढाया, त्याला आकाश डोंगरेची मिळालेली पकडीची साथ यामुळे हे शक्य झाले. शेवटच्या सामन्यात लायन्स स्पोर्ट्सने शिवशक्ती मंडळाला 39-34 असे नमवित उपांत्य फेरी गाठली. झंझावाती सुरुवात करीत 2 लोण देत लायन्स ने पूर्वार्धात 25-16 अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात सावध खेळ करीत ही आघाडी ठिकवित आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. राज आचार्य, हर्ष मोरे यांच्या धडाकेबाज चढाया, तर शुभम मटकर याचा बचाव या विजयात महत्वपूर्ण ठरला.