बल्लाळेश्‍वरनगरी पर्यटकांनी गजबजली

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या बल्लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी पुणे-मुंबईसह राज्यभरातील पर्यटकांची पावले वळली आहेत. पाली येथे बल्लाळेश्‍वर मंदिर, सरसगड, सुधागड किल्ले, गरम पाण्याचे कुंड उन्हेरे, ठाणाळे, गोमाशी लेण्या पाहण्यासाठी पर्यटकांसह शाळकरी व महाविद्यालयीन सहली व विद्यार्थ्यांचा ओघ प्रचंड आहे. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, दुकानदार यांची सध्या चलती आहे. परिसरातील दुकाने, हॉटेल व लॉज ग्राहकांनी गजबजले होते. येथील हॉटेल, खेळण्यांची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार, फुले व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले होते. मंदिर परिसरात वर्दळ होती. भाविकांच्या सोयीसाठी बल्लाळेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

देवस्थान ट्रस्टने पर्यटकांना अत्याधुनिक व विशेष सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंगदेखील आहे. प्रसादालय खुले आहे. तसेच सुसज्ज स्वच्छतागृहदेखील उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचे बल्लाळेश्‍वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांनी सांगितले.

Exit mobile version