आपले प्रतिबिंब पहा आणि मग ठरवा

 रणवीर राजपूत

गत कालखंडात पत्रकारिता ही खऱ्या अर्थाने लोकचळवळ होती. देशासाठी त्यागाचा-आत्मसमर्पणाचा मानस आद्य पत्रकारांचा होता. त्यागीवृत्तीने तत्कालिन पत्रकार-संपादक आपले सामाजिक  उत्तरदायित्व पूर्ण करत असत. त्यातूनच पुढे स्वातंत्र्य चळवळीला चालना मिळण्यास हातभार लागला. वास्तवात लेखणीत किती बळ असते, याची प्रचिती कर्मकांडी समाजाला जांभेकरांमुळे आल्याने पुढील कालखंडातील समाजसुधारकांना स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्याचा मार्ग सुकर झाला. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा…

भारतीय लोकशाहीत पत्रकारिता या चौथ्या स्तंभाला अनन्यसाधारण महत्व आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे महाराष्ट्राला समृद्ध पत्रकारितेची परंपरा लाभली आहे.वर्तमानपत्र हे खऱ्या अर्थाने समाजाचा आरसा असल्याने त्यातून समाज मनाचे प्रतिबिंब उमटत असते. समाजाच्यादृष्टीने काय योग्य अन्‌‍‍ काय अयोग्य याचे अचूक निदान करणारे माध्यम म्हणजे वृत्तपत्र. या पार्श्वभूमीवरच आद्य पत्रकार/ -संपादक बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या वृत्तपत्राचे नाव दर्पण ठेवले. 19 व्या शतकातल्या पूर्वार्धामधील पत्रकारितेचा विचार केला तर,त्यावेळी पत्रकारिता अन्‌‍‍ वृत्तपत्र चालविणे हे एक सामाजिक व्रत होते.त्याकाळात वृत्तपत्राचे मालक-संपादक हे केवळ लोकशिक्षण व जनजागृती ही द्वय मूल्ये जोपासून खिश्यातील पैश्याने आपलं वृत्तपत्र छापत असतं. व्यावसायिक दृष्टिकोन तर त्यांच्या मनाला कधी शिवलाच नाही.जाज्वल्य राष्ट्रप्रेम अन्‌‍‍ निस्सीम देशाभिमान ही द्वय तत्वे संपादकांची अंगिकारली होती. गत कालखंडात पत्रकारिता ही खऱ्या अर्थाने लोकचळवळ होती. देशासाठी त्यागाचा-आत्मसमर्पणाचा मानस आद्य पत्रकारांचा होता. त्यागीवृत्तीने तत्कालिन पत्रकार-संपादक आपले सामाजिक उत्तरदायित्व पूर्ण करत असत.त्यातूनच पुढे स्वातंत्र्य चळवळीला चालना मिळण्यास हातभार लागला.

19 व्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटिश राजवटीत मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवण्याची कामगिरी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी केली अन्‌‍‍ मराठी पत्रकारिता नावरूपाला आली. मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण या मराठी  दैनिकाचा शुभारंभ केला अन्‌‍‍ हे वृत्तपत्र महाराष्ट्रातले पहिले मराठी वर्तमानपत्र ठरले. बाळशास्त्री जांभेकरांनी पत्रकारिता क्षेत्राला जे बहुमूल्य योगदान दिले, त्याचे स्मरण महाराष्ट्राला सदैव व्हावे, या उद्देशाने आज द्विशतकानंतरही 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून समस्त पत्रकार/संपादक राज्यात साजरा करत आहेत. वास्तवात हीच खरी दर्पणकारांना मानवंदना आहे.

वंदनीय बाळशास्त्री जांभेकर यांचा काळ हा पारतंत्र्याचा होता. ‌‘हम करे सो कायदा’ या आविर्भाने इंग्रज सरकार भारतीयांशी व्यवहार करत होते. तत्कालिन समाजातील अज्ञान, उच्च-निचता, जातीभेद, अंधश्रद्धा, बालविवाह पद्धती, विधवांसाठी केशवपन, स्त्री जातीला दिलेला दुय्यम दर्जा ह्या सर्व अपप्रवृत्तींविरुद्ध वाचा फोडण्यासाठी जांभेकरांनी दर्पण या आयुधाचा प्रभावीपणे वापर केला. इतकेच नव्हे तर एक पाऊल पुढे टाकत, भारतीयांना गुलामगिरीच्या बेड्यातून मुक्त करून त्यांच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग जागविण्यासाठी बाळशास्त्रींनी आपली पत्रकारिता परखडपणे वापरली. त्याची परिणती म्हणजे सर्वधर्मीय लोकांच्या मनात स्वातंत्र्याची उत्कंठा निर्माण झाली.

दर्पणकार हे पत्रकार तर होतेच, त्याबरोबरच सच्चे स्वातंत्र्यसेनानीही होते. भारतीयांच्या मनात  राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करून आता गुलामगिरीला झुगारून दिलं पाहिजे अन्‌‍‍ स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतला पाहिजे,या दृष्टिकोनातून जांभेकरांनी दर्पण सुरू केला. पहा, आपले प्रतिबिंब अन्‌‍‍ मगच ठरवा असे दर्पणच्या माध्यमातून आवाहन करत भारतीयांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभागी होण्यास सज्ज व्हावे,असं आवाहन केलं. वास्तविक पहाता, बाळशास्त्री हे क्रांतिकारक विचारांचे देशभक्त पत्रकार होते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जांभेकरांनी 19 व्या शतकाच्या पूर्वार्धातच अनुकूल वातावरण निर्माण करून देत, मराठी पत्रकारितेने आपल्या लेखणीच्या शक्तीचे इंग्रज शासकांना दर्शन घडविले. बाळशास्त्री हे महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील समाजसुधारक होते. याच भूमिकेतूनच पुढे त्यांनी स्त्रीमुक्तीसाठी लढा दिला. दर्पणच्या माध्यमातून तथाकथित सती प्रथा तत्कालिन समाजाच्या मनातून हद्दपार करण्यासाठी व्यापक जनजागृती केली.त्यासाठी आधी स्त्रियांना पुरुषांप्रमाणे शिक्षण देण्यास पुढाकार घेतला.

त्यामुळे महिलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होऊन त्यांना आपल्या मानवी हक्कांची जाण आली. अशाप्रकारे स्त्रीशक्तीही जागृत होऊन तत्कालिन सामाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी हिरिरीने भाग घेऊ लागल्या. हेच खरे दर्पणकारांच्या समाज प्रबोधनाचे फलित होय. वृत्तपत्र हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असल्याने बाळशास्त्रींनी त्याद्वारे बाल विवाह, सती प्रथा विरुद्ध लढा पुकारला. तर विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन देत स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, अशी त्यांनी आग्रही भूमिका होती.स्त्री शिक्षणाच्या चळवळीत ते सदैव अग्रस्थानी राहिले. घरा- घरातील स्त्रिया शिकून- सवरून ज्या सुधारणा राबवतील, त्याच पुढे समाजात रूढ होतील, असे त्यांचे ठाम मत असल्याने त्या दिशेने त्यांनी ठोस पावलं उचलून आपल्या दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनजागृती केली. स्त्री-पुरुषात समानता प्रस्थापित करण्यात जांभेकरांचा सिंहाचा वाटा राहिला. यासाठीच भारतीय समाजसुधारकांमध्ये जांभेकरांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतलं जातं.

वास्तवात लेखणीत किती बळ असते, याची प्रचिती कर्मकांडी समाजाला जांभेकरांमुळे आल्याने पुढील कालखंडातील समाजसुधारकांना स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्याचा मार्ग सुकर झाला.जांभेकरांनी पुढील काळात दिग्दर्शन हे मासिकही प्रकाशित केले. स्त्रियांना विद्याभ्यास करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी स्वकियांनी पुढे यावे, असे आवाहन केले. कारण स्त्रीला व्यापार/व्यवसाय करण्याची बुद्धी पुरुषापेक्षा जास्त असते, त्यातून समाज सुशिक्षित-सजग होण्यास खऱ्या अर्थाने चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जांभेकर हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. आपले राज्य कसे गेले अन्‌‍‍ इंग्रजांचे राज्य कसे आले, याचे अचूक निदान करणारे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे होत, असे गौरवोद्गार थोर साहित्यिक व पत्रकार आचार्य अत्रे यांनी काढले. न्या.ना.ग. चंदावरकर यांनी त्यांचा पश्चिम भारतातील आद्य ऋषी ही उपमा देऊन गौरविले. बाळशास्त्रींचे विद्यार्थी दादाभाई नौरोजी यांनी आपल्या गुरूंची प्रख्यात पंडित व अद्वितीय विद्वान या शब्दात महिमा गायली.

इतकेच नव्हे तर,मुंबईचे तत्कालिन गव्हर्नर सर जेम्स कर्नाक यांनी त्यांच्या बहुआयामी सामाजिक कार्याबद्दल ‌‘जस्टिस ऑफ द पिस’ हा किताब बहाल केला. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे दर्पणकार यांच्याबद्दल केवळ भारतीयच नव्हे तर,विदेशी राज्यकर्त्यांना देखील आदर होता, हे सिद्ध होते. सन 1812 ते 1846 हा अल्पशा जीवनकाळ त्यांनी समाज प्रबोधन, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकचळवळ उभारणे, जनजागृती, ज्ञानोपसाना, विद्यादान करण्यात व्यतित केला. जेव्हा एक पत्रकार तिरंगा हाती घेतो, त्यावेळी पत्रकारांची छाती अभिमानाने ताट होते. यास्तव आम्ही महाराष्ट्रातील समस्त पत्रकार दर्पणकार द्रोणाचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्रिवार वंदन करतो!

Exit mobile version