। पाली । वार्ताहर ।
आपल्या पूर्वजांकडून मिळालेली ही पारंपारीक नाचाची कला जिवंत ठेवण्यासाठी पेण तालुक्यातील दुरशेत गावातील सुशिक्षित तरुणांनी पुढाकार घेतला आहे. हे तरुण व लहानगे बाल्या नाच आणि माळी नाचातून प्रबोधनसुद्धा करत आहेत. या वर्षी ही दसर्याच्या मुहूर्तावर बाल्या नाच आणि माळी नाचाची बारी झाली. तसेच, दिवाळीलादेखील होणार आहे.
आधुनिकतेच्या युगात समाजामध्ये बाल्या नाच आणि माळी नाचाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. तरुण पिढीने याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे ही लोककला आता लोप पावत चालली आहे. आपल्या पुर्वजांची हि कला टिकावी, तिचे जतन व्हावे यासाठी दुरशेत गावातील सुशिक्षित तरुण आपापली नोकरी व व्यवसाय सांभाळून मागील पंधरा वर्षापासून स्वतः हि कला जोपासत आहेत. यासाठी या तरुणांना तारेवरची मोठी कसरत करावी लागते. यातील अनेक तरुण पदवीधर, पदव्युत्तर पदवी, पीएचडी, सेट व नेटधारक आहेत. तर कोणी इंजिनियरदेखील आहेत. मात्र, प्रत्येकजण तनमनधनाने कोणताही संकोच न बाळगता हि कला सादर करतात व त्यासाठी मेहनत घेत आहेत. ही कला जतन करण्यासाठी गावातील लोकांचा खुप मोठा सहभाग व सहकार्य आहे. प्रत्येक कार्यक्रमावेळी दूरशेत गावातील ग्रामस्थ तरुणांसोबत असतात. विशेष म्हणजे आपली पारंपारीक कला आपली मुलं, आपली नातवंड पुढे नेतात याचा गावातील वृद्धांना खूप आनंद व समाधान वाटते.