भोगावती पुलावर उभारला बांबूचा कठडा

रिक्षाचालकांचे प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतप्त आंदोलन

| पेण | प्रतिनिधी |

पेण शहरातील भोगावती पुलावरील जीवघेण्या परिस्थितीकडे प्रशासनाने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षाचा संताप अखेर रिक्षाचालकांच्या आंदोलनातून उफाळून आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणा झोपेचे सोंग घेत असताना, तीन चाकी चालक-मालक संघटना, चावडी नाका, पेण यांनी पुढाकार घेत पुलावर स्वतः बांबूचा तात्पुरता संरक्षण कठडा उभारून शासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर जोरदार चपराक लगावली.

विशेष म्हणजे, हा कठडा उभारण्यासाठी वापरण्यात आलेले बांबू हे अंत्यविधीसाठी वापरले जाणारे बांबू होते. जिवंत नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी शासनाकडे निधी, यंत्रणा किंवा इच्छाशक्ती नसल्याने मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरले जाणारे बांबू आणून नागरिकांनाच संरक्षण उभारावे लागत आहे, यापेक्षा प्रशासनाच्या अपयशाचे मोठे उदाहरण कोणते, असा संतप्त सवाल रिक्षाचालकांनी उपस्थित केला.

गेल्या 6 मे रोजी याच पुलावर एका रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुलावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात रिक्षा नियंत्रणाबाहेर जाऊन थेट नदीत कोसळली. कारण पुलाला संरक्षण कठडाच नव्हता. एका निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ खड्डे बुजविण्याची दिखाऊ कार्यवाही करून आपली जबाबदारी झटकली. अपघाताचे मूळ कारण असलेल्या संरक्षण कठड्याबाबत मात्र कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत.

लाखो-कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या घोषणा करणारे शासन आणि प्रशासन एका पुलावर साधा संरक्षण कठडा उभारू शकत नसेल, तर हा विकास नेमका कोणासाठी, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. जीवितहानी झाल्यानंतरही अधिकाऱ्यांची संवेदनशीलता जागी होत नसेल, तर ती केवळ निष्काळजीपणा नसून नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखी बाब असल्याची टीका यावेळी करण्यात आली.

रिक्षाचालकांनी उभारलेला बांबूचा कठडा हा केवळ तात्पुरता सुरक्षेचा उपाय नाही, तर तो प्रशासनाच्या बेजबाबदार आणि उदासीन कारभाराविरोधातील तीव्र निषेधाचे प्रतीक बनला आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार? आणखी किती कुटुंबे उद्ध्वस्त झाल्यानंतर अधिकारी फाईलीतून बाहेर पडणार? असे संतप्त प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले.

भोगावती पुलावर कायमस्वरूपी आणि मजबूत संरक्षण कठडा तातडीने उभारण्यात यावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा तीन चाकी चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी शासनाने करावयाचे काम अखेर रिक्षाचालकांना स्वतःच्या खर्चाने आणि पुढाकाराने करावे लागत असल्याचे विदारक चित्र पेणमध्ये पाहायला मिळत असून, यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Exit mobile version