| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सध्या पर्यटनाचा हंगाम सुरु आहे. थर्टीफर्स्टनिमित्त पर्यटक जिल्ह्यात विशेष करून अलिबाग तालुक्यात दाखल झाले आहेत. वाहतूक कोंडीपासून बचाव करण्यासाठी या कालावधीत पुढील दोन दिवस म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्यात यावी, अशी मागणी शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी केली आहे.
अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे. अलिबाग, वरसोली, किहीम, आक्षी, नागाव, रेवदंडा अशा अनेक पर्यटनस्थळी पर्यटकांची थर्टीफर्स्टला गर्दी होते. यावर्षीदेखील पर्यटकांची अलिबागमध्ये येण्याची लगबग सुरु झाली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लाखो पर्यटक अलिबागमध्ये दाखल होत आहेत. दरमयान, खराब रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न भेडसावत असताना अवजड वाहनांमुळेदेखील वाहतूक कोंडीला सामोरे जाण्याची वेळ पर्यटकांवर येण्याची शक्यता आहे. पर्यटनावर आधारित व्यवसायांवर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यटकांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा, यासाठी पुढील दोन दिवस 31 डिसेंबरपर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्यात यावी, अशी मागणी सुरेश घरत यांनी केली आहे.





