गणेशोत्सवात महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

कोंडी टाळण्यासाठी शासनाचा निर्णय; 11 ते 26 सप्टेंबरदरम्यान विविध टप्प्यांत निर्बंध

| रायगड | प्रतिनिधी |

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुरळीत व्हावा आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी राज्य शासनाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर 16 टन किंवा त्याहून अधिक वजनक्षमतेच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. परिवहन विभागाने याबाबत आदेश जारी केला आहे.

गणेशोत्सव काळात कोकणात एसटीच्या जादा बसेससह खासगी वाहनांची मोठी वर्दळ वाढते. त्यात अवजड वाहने, ट्रेलर आणि वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे मोटार वाहन अधिनियमातील तरतुदींनुसार हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

या वाहनांना बंदीतून सवलत
प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून दूध, पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, औषधे, लिक्विड ऑक्सिजन, भाजीपाला, अन्नधान्य व नाशवंत माल वाहून नेणाऱ्या वाहनांना बंदीतून सवलत देण्यात आली आहे. तसेच रुग्णवाहिका, पोलीस, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन व अन्य अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही निर्बंध लागू राहणार नाहीत. जेएनपीटी व जयगड बंदरातून आयात-निर्यात मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही सवलत देण्यात आली आहे.
या दिवशी अवजड वाहनांना बंदी
मूर्ती आगमन व पूर्वतयारीचा प्रवास : 11 सप्टेंबर 2026 मध्यरात्री 00:01 वाजेपासून ते 15 सप्टेंबर 2026 रात्री 23:00 वाजेपर्यंत.
पाच दिवसांचे गणपती विसर्जन/परतीचा प्रवास : 18 सप्टेंबर 2026 सकाळी 08:00 ते रात्री 23:00 वाजेपर्यंत.
गौरी-गणपती विसर्जन (सात दिवस) / परतीचा प्रवास : 19 सप्टेंबर 2026 सकाळी 08:00 ते रात्री 23:00 वाजेपर्यंत आणि 20 सप्टेंबर 2026 रात्री 23:00 वाजेपर्यंत.
अनंत चतुर्दशी (विसर्जन व परतीचा मोठा प्रवास) : 25 सप्टेंबर 2026 सकाळी 08:00 वाजेपासून ते 26 सप्टेंबर 2026 रात्री 20:00 वाजेपर्यंत.
स्थानिक परिस्थितीनुसार गरज भासल्यास निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार नवी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि संबंधित जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
Exit mobile version