आदेश मोडल्यास होणार कारवाई
। पनवेल । प्रतिनिधी ।
पावसाळ्यात होणारे संभाव्य अपघात आणि पर्यटकांचा बुडून होणारा मृत्यू रोखण्यासाठी नवी मुंबई पोलीस प्रशासनाने यावर्षी कडक पाऊल उचलले आहे. खारघर आणि तळोजा परिसरातील निसर्गरम्य, मात्र तितक्याच धोकादायक ठरणाऱ्या प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, ही सर्व ठिकाणे ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या संदर्भात खारघर पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना सतर्क करण्यासाठी ठिकठिकाणी जाहीर सूचनांचे फलक लावण्यात आले आहेत. तसेच, या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, खारघरमधील डोंगररांगा आणि धबधब्यांवर आनंद घेण्यासाठी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. मात्र, अनेकदा अतिउत्साहाच्या भरात किंवा निष्काळजीपणामुळे अनेक दुर्घटना घडतात. खारघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात पांडवकडा, चाफेवाडी, फणसवाडी, ड्रायव्हिंग रेंज सेक्टर-5, ओवेकॅम्प धरण, तळोजा जेल समोरील डोंगर आणि तळोजा समोरील तलाव या ठिकाणी पर्यटक गंभीर जखमी होण्याच्या तसेच पाण्यात बुडून जीव गमावण्याच्या अनेक दुर्दैवी घटना यापूर्वी घडल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पोलीस प्रशासनाने हा कठोर निर्णय घेतला आहे.
या आदेशाचे उल्लंघन करून, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये विनापरवाना प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तीवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा खारघर पोलिसांनी पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना दिला आहे. त्यामुळे अतिउत्साही पर्यटकांनी आपला जीव धोक्यात न घालता प्रशासनाला सहकार्य करावे आणि सुरक्षित राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
