दोन महिन्यांसाठी केली बंदी; पोलीस करणार कारवाई
नेरळ । वार्ताहर ।
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक हे धबधबे किंवा तलावाच्या ठिकाणी येत असून जीवितहानी होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच यावर्षी धबधबा, धरण, पाणवठे आणि तलाव या क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होऊ नये याकरिता हे प्रतिबंधात्मक (कलम 144) आदेश प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांनी पारित केले आहेत.
कर्जत उपविभागात येणार्या कर्जत आणि खालापूर तालुक्यातील एकूण 23 ठिकाणी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश 9 जून ते 8 ऑगस्ट 2021 पर्यंत लागू असतील. सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पाण्याच्या प्रवाहात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील आषाणे-कोषाणे धबधबा, सोलनपाडा धरण, पळसदरी धरण, कोंढाणे धरण आणि धबधबा, पाली भुतीवली धरण, नेरळ जुमापट्टी धबधबा, बेडीसगाव धबधबा, पाषाणे तलाव, बेकरे धबधबा, आनंदवाडी धबधबा, टपालवाडी धबधब्यावर जाण्यास बंदी आहे. तर खालापूर तालुक्यातील झेनिथ धबधबा, आडोशी धबधबा, आडोशी तलाव, बोरगाव धबधबा, भिलवले धरण, मोरबे डॅम, नढाळ – वरोसे धरण, वावर्ले धरण, माडप धबधबा, धामणी धबधबा, कलोते आणि सर्व पाठवठे आणि धरणावर जाण्यास बंदी आहे.
असे असणार प्रतिबंध
पावसामुळे निर्माण झालेल्या धबधबे परिसरात मद्य करण्यास व विक्री करणे आणि मद्यधुंद अवस्थेत असणे, सेल्फी अगर चित्रीकरण करणे, धोकादायक ठिकाणी वाहन थांबवणे, वाहन वेगाने चालवणे, वाहतुकीस अडथळा आणणं किंवा धोकादायक स्थितीत वाहने चालवणे आणि त्यांना ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी केरकचरा करणे, महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, असभ्य वर्तन आणि अश्लील हावभाव करणे, लज्जा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य तसेच सार्वजनिक ठिकाणी डीजे मोठ्याा आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, जल, वायू, ध्वनी प्रदूषण करणे यांना सक्त मनाई करण्यात आली आहे.