बांधपाडा ग्रामपंचायत गैरव्यवहारप्रकरणी उपोषण

। उरण । वार्ताहर ।
येथील बांधपाडा ग्रामपंचायतींमध्ये सरपंच विशाखा ठाकूर व ग्रामसेवक वैभव पाटील यांनी चालविलेल्या मनमानी कारभारामुळे 84 लाखांच्या कथित गैरव्यवहार झाल्याचा दावा करीत या प्रकरणी कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी बुधवारी उरण गटविकास अधिकार्‍यांच्या कार्यालयासमोरच बांधपाडा ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणामध्ये उपसरपंचासह, सेना-काँग्रेसच्या सात सदस्य व ग्रामस्थांचाही समावेश आहे.

उरण तालुक्यातील बांधपाडा ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 11 आहे. यामध्ये सेना 3, काँग्रेस 3, शेकाप आणि अपक्ष 3 सदस्यांचा समावेश असून सरपंचपदी भाजपच्या विशाखा ठाकूर थेट निवडून आलेल्या आहेत. सरपंच विशाखा ठाकूर आणि सप्टेंबर 2021 पासून ग्रामपंचायतींमध्ये कामामध्ये रुजू झालेले ग्रामसेवक वैभव पाटील या दोघांनी अन्य सदस्यांना अंधारात ठेवून संगनमताने गैरकारभार करण्यास सुरुवात केली असल्याचा या सदस्यांचा आरोप आहे.

ग्रामपंचायत ग्रामनिधीतून कोणत्याही प्रकारची कामे, साहित्य खरेदी न करता खोटी, बनावट कागदपत्रे बनवणे, खरेदीपेक्षा जास्त रकमेची देयके अदा करणे यापोटी एकूण सुमारे 84 लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विभागीय कोकण आयुक्त व राजिप मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे सेना-काँग्रेसच्या सात सदस्यांनी तक्रारीद्वारे केली आहे. मात्र 23 मे 2022 रोजी केलेल्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचा गंभीर आरोप उपसरपंच सुजीत म्हात्रे यांनी केला आहे. दरम्यान प्रभारी गटविकास अधिकारी संजय भोये यांनी लेखी कारवाईचे पत्र दिल्यानंतर स्थगित करण्यात आले.

ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी शिवसेना असताना त्यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. तत्कालीन सरपंच यांनी एकरकमी 50 व 20 लाख काढल्याच्या नोंदी आहेत. तसेच चाणजे व भेंडखळ ग्रामपंचायत मधील शिपाई व क्लार्क यांच्या नांवाने व ग्रामस्थांच्या नावाने कोट्यवधी रुपयांची उलाढाल बांधपाडा (खोपटे) ग्रामपंचायतमध्ये केली आहे. हे उघड होऊ नये म्हणून आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत.

विशाखा ठाकूर, सरपंच बांधपाडा

Exit mobile version