पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न भंगले; पराभवानंतर विराट कोहली भावूक
। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।
रॉयल चलेंजर्स बंगळुरु हा आयपीएलमधील एकमेव संघ आहे. जो सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. मात्र, त्यांना विजेतेपद मिळवता आले नाही. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर देखील त्याचीच पुनरावृत्ती झाली. आयपीएल 2024 मध्ये एलिमिनेटरची लढत नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडली. अहमदाबादमध्ये झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत केले. सलग सहा विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवणार्या फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वातील बंगळुरुचा पराभव झाला. या पराभवासह आरसीबीचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले. बंगळुरूने या हंगामात कठोर परिश्रमानंतर पुनरागमन केले आणि सलग 6 सामने जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरले. पण, आता एलिमिनेटर सामन्यात आरसीबीला राजस्थानविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पराभवाने आरसीबीच्या करोडो चाहत्यांचे स्वप्न भंगले आहे.
राजस्थान रॉयल्सने बंगळुरुवर विजय मिळवून क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे. आता राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात 24 मे रोजी चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर क्वालिफायर-2 ची लढत होणार आहे. या लढतीमधील विजेता संघ अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्स विरोधात लढेल. विराट कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. राजस्थान विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर विराट कोहली भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. राजस्थान रॉयल्सने विजय मिळवल्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तोंदलन केले. यावेळी विराट कोहलीने देखील खेळाडूंची भेट घेतल्यानंतर आयपीएलमधून निवृत्त होत असलेल्या दिनेश कार्तिकला विराटने मिठी मारली आणि तो स्टम्प जवळ गेला आणि त्याने बेल्स उडवल्या. विराट कोहलीने एलिमिनेटरमध्ये बंगळुरुला आक्रमक सुरुवात करुन दिली होती. विराटने एक षटकार आणि तीन चौकारासह 24 बॉलमध्ये 33 धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करताना बंगळूरूने राजस्थानला केवळ 173 धावांचे लक्ष्य दिले होते. येथून बंगळूरून सामना सहज हरेल असे वाटत होते. पण बंगळुरूच्या गोलंदाजांनी आपली ताकद दाखवत सामना आल्याकडे झुकवला. त्यामुळे आता बंगळुरू सामना जिंकू शकेल असे वाटत होते, पण अखेरीस बंळुरूला पराभव पत्करावा लागला. पराभवानंतर बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने याचे कारण सांगितले आहे.
एलिमिनेटर सामना हारल्यानंतर फॅफ म्हणाला की, अनेक संघ 1ते 9 जागेवर थांबले होते. परंतु, आम्ही आमचे सर्वोत्तम दिले आणि सर्वांना धक्का बसेल अशा प्रकारे पुनरागमन केले. आम्ही 8 पैकी 7 सामने गमावले होते. असे असूनही, पुनरागमन केल्याबद्दल संघ कौतुकास पात्र आहे. फाफ पुढे म्हणाला की, जेव्हा आम्ही पाहिले की मैदानावर भरपूर दव आहे, तेव्हा आम्हाला वाटले की आम्ही 20 धावा कमी केल्या आहेत. या खेळपट्टीवर 180 धावा ही चांगली धावसंख्या ठरली असती. सुरुवातीला चेंडूही स्विंग होत होता. तथापि, नवीन इम्पॅक्ट खेळाडू नियमानुसार या धावसंख्येचा बचाव करणे कठीण होते. गेल्या सहापैकी सहा सामने जिंकून आम्ही चांगले पुनरागमन केले होते. आज आम्ही फलंदाजीत तशी खास कामगिरी दाखवली नाही.
आठ हजार धावांची नोंद विराट कोहलीने आयपीएलमध्ये 8 हजार धावांची नोंद केली आहे. विराट कोहली आयपीएलमध्ये 8 हजार धावांचा टप्पा ओलंडणारा पहिला खेळाडू टरला आहे. विराटने आयपीएलमधील 15 धावांमध्ये 741 धावा केल्या आहेत. विराटने एक शतक आणि पाच अर्धशतके केली आहेत. विराटने 154.70 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.
ऑरेंज कॅप कोहलीच्या नावावर बंगळुरुचा संघ जरी आयपीएलमधून बाहेर गेलेला असला तरी ऑरेंज कॅप त्याच्याकडे राहण्याची शक्यता आहे. विराटच्या नावावर 741 धावा आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड दुसर्या स्थानावर आहे. तर, रियान पराग तिसर्या स्थानावर असून त्याने 13 मॅचमध्ये 567 धावा केल्या आहेत. ट्रेविस हेड चौथ्या स्थानावर असून 13 मॅचमध्ये 533 धावा केल्या आहेत. यानंतर पाचव्या स्थानी संजू सॅमसन असून त्यांन 521 धावा केल्या आहेत.