बांगलादेशने न्यूझीलंडला चारली धूळ

पहिल्या कसोटी सामन्यात विजय

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

बांगलादेश न्यूझीलंडमधील पहिल्या कसोटी सामन्यात यजमान बांगलादेशने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने न्यूझीलंडचा 150 धावांनी पराभव केला. यासह त्यांनी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. बांगलादेशचा न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील हा दुसरा विजय आहे. यापूर्वी गेल्या वर्षी 23 महिन्यांपूर्वी बांगलादेशने माऊंट मौनगानुई कसोटीत न्यूझीलंडचा त्यांच्याच भूमीवर पराभव केला होता.

या कसोटी सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने पहिल्या डावात 310 धावा केल्या होत्या. सलामीवीर महमुदुल हसन जॉयने 86 धावांची खेळी केली. तर न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिपने चार गडी बाद केले. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावाला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडचा संघ केवळ 317 धावा करू शकला. केन विल्यमसनने संघासाठी उत्कृष्ट 104 धावा केल्या. याशिवाय ग्लेन फिलिप्सने 42 आणि डॅरिल मिशेलने 41 धावांचे योगदान दिले. अशाप्रकारे बांगलादेशी संघाला पहिल्या डावात 7 धावांची किरकोळ आघाडी मिळाली.

पहिल्या डावात अवघ्या 7 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर बांगलादेशचा संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्यांच्यासमोर कठीण लक्ष्य ठेवण्याचे आव्हान होते. अशा स्थितीत कर्णधार शांतोने 105 धावांची दमदार खेळी केली. शांतोशिवाय मुशफिकुर रहीमने 67 धावा आणि मेहदी हसन मिराजनेही 50 धावा करत संघाला मजबूत स्थितीत आणले. त्यामुळे बांगलादेशने दुसऱ्या डावात 338 धावा केल्या आणि न्यूझीलंडला 332 धावांचे लक्ष्य मिळाले.

चौथ्या डावात फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. आणि संपूर्ण संघ 181 धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशकडून तैजुल इस्लामने या डावात 6 बळी बाद केले. तर पहिल्या डावात 4 गडी टिपले होते. फलंदाजीत डॅरिल मिशेल वगळता, न्यूझीलंडकडून कोणीही चमत्कार करू शकला नाही.

Exit mobile version