पाकिस्तानला पाजले पराभवाचे पाणी; डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेतही भरारी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
बांगलादेश क्रिकेट संघाने बुधवारी इतिहास घडवला. सिल्हेटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला 78 धावांनी पराभूत केले. कसोटी मालिकेतील हा दुसरा सामना असल्याने बांगलादेशने पाकिस्तानल व्हाईटवॉश देण्याचाही इतिहास घडवला. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 स्पर्धेचाही भाग होती. त्यामुळे बांगलादेशला मोठा फायदा झाला असून, आता त्यांनी डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत भारतालाही मागे टाकले आहे. बांगलादेश आता 58.33 टक्केवारीसह पाचव्या क्रमांकावर आहे. तर, भारत 6 व्या क्रमांकावर घसरला आहे.
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 77 षटकात सर्वबाद 278 धावा केल्या होत्या. या डावात लिटन दासने 159 चेंडूत 126 धावांनी शतकी खेळी केली होती. यावेळी पाकिस्तानकडून खुरम शेहजादने 4 बळी, मोहम्मद अब्बासने 3 बळी, तर हसन अलीने 2 बळी घेतले. त्यानंतर पाकिस्तानला पहिल्या डावात 57.4 षटकात सर्वबाद 232 धावा केल्या. त्यामुळे बांगलादेशला 46 धावांची आघाडी मिळाली. पाकिस्तानकडून या डावात केवळ बाबर आझमने झुंज देताना 68 धावांची खेळी केली. यावेळी बांगलादेशकडून नाहिद राणा आणि तैजुल इस्लाम यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. तर, तस्कीन अहमद आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
दुसऱ्या डावात बांगलादेशकडून मुशफिकूर रहिमने 137 धावांची शतकी खेळी केली. तर लिटन दासने 69 व महमुद्दुल हसन जॉयने 52 धावांची खेळी केली. त्यामुळे बांगलादेशने तब्बल 390 धावा केल्या आणि पहिल्या डावातील 46 धावांच्या आघाडीमुळे 437 धावांचे लक्ष्य पाकिस्तानला दिले होते. यावेळी पाकिस्तानकडून खुरम शेहजादने 4 बळी घेतले. तर, साजिद खानने 3 बळी घेतले. त्यानंतर 437 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला 97.2 षटकात सर्वबाद 258 धावाच करता आल्या. मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 94 धावांची खेळी केली. तर, सलमान आघाने 71, कर्णधार शान मसूदनेही 71 व बाबर आझमने 47 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून गोलंदाजी करताना तैजुल इस्लामने सर्वाधिक 6 बळी, तर नाहिद राणाने 2 बळी घेतले.
58.33 टक्केवारीसह पाचव्या क्रमांकावर
बांगलादेश क्रिकेट संघ आता 4 सामन्यांनंतर 2 विजय, 1 पराभव आणि 1 अनिर्णित अशा निकालांसह 58.33 टक्केवारीसह पाचव्या क्रमांकावर आहे. तर, भारतीय संघ मात्र आता 6व्या क्रमांकावर घसरला आहे. भारताने 9 सामन्यांपैकी 4 सामने जिंकले आहेत. तर, 4 सामने पराभूत झाले असून, 1 सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे भारताची टक्केवारी 48.15 इतकी आहे. पाकिस्तानचीही या दोन्ही पराभवांमुळे मोठी घसरण झाली आहे. ते थेट 8व्या क्रमांकावर घसरले आहेत. पाकिस्तानने 4 सामन्यांत फक्त एकच सामना जिंकला आहे, तर 3 सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांची टक्केवारी 8.33 इतकी खराब झाली आहे.
