नेपाळवर 21 धावांनी विजय
| फ्लोरिडा | वृत्तसंस्था |
टी-20 विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश विरुद्ध नेपाळ संघात सोमवारी (दि.17) सामना पार पडला. सेंट विन्सेंट येथे झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात नेपाळचा 21 धावांनी पराभव करत बांगलादेशने त्यांचे सुपर-8मधील स्थानही निश्चित केले आहे. दरम्यान, हा सामना चालू असताना दोन्ही संघांच्या दोन खेळाडूंमध्ये वाद झाल्याचेही पाहायला मिळाले.
नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकात सर्वबाद 106 धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून एकाही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यांच्याकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक 17 धावा केल्या आहेत. त्याशिवाय महमुद्दुलाह (13), रिषाद हुसैन (13), तस्किन अहमद (12), जेकर अली (12) आणि लिटन दास (10) यांनी दोन आकडी धावा केल्या. नेपाळकडून गोलंदाजी करताना सोमपाल कामी, दिपेंद्र सिंग, रोहित पौडेल आणि संदीप लामिछाने या सर्वांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
त्यानंतर 107 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळचा संघ 19.2 षटकात 85 धावांवर सर्वबाद झाला. नेपाळकडून कुशल मल्लाने सर्वाधिक 27 धावा केल्या. तसेच, दिपेंद्र सिंग ऐरेने 25 धावा केल्या. असिफ शेखने 17 धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी धावा करता आल्या नाही. बांगलादेशकडून तांझिम हसन साकिबने सर्वाधिक 4 बळी घेतले. तसेच, मुस्तफिजूर रेहमानने 3 बळी तर शाकिब अल हसनने 2 आणि तस्किन अहमदने 1 बळी घेतला. या विजयासह बांगलादेश संघानेही पुढील फेरी गाठली आहे.
दोन खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाची बांगलादेशने नेपाळसमोर 107 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळला तांझिम हसन साकिबने सुरुवातीलाच मोठे धक्के दिले होते. त्याने तिसऱ्या षटकात पहिल्या पाच चेंडूत एकही धाव खर्च न करता दोन बळी घेतले होते. यानंतर या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलने पाँइंटच्या दिशेने शॉट खेळला. त्यावेळी रोहितने केलेला बचाव पाहून साकिबने त्याच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकला. यामुळे रोहित आणि साकिब यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचे दिसले. हा वाद एकाक्षणी इतका वाढला की अन्य खेळाडूंना दोघांमध्ये पडून त्यांना दूर करावे लागले. या घटनेचा व्हिडिओ आयसीसीनेही सोशल मीडियावर शेअर केला आहे.