बांग्लादेशच्या पंतप्रधान हसीना शेख यांचा राजीनामा

| ढाका | वृत्तसंस्था |

बांग्लादेशमध्ये हिंसाचाराने आगडोंब उसळला असून आतापर्यंत जवळपास 300 जणांचा मृत्यू झाला आहे. बांग्लादेशमध्ये सत्तापालटाचे वारे वाहू लागले असून पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. शेख हसीना राजधानी ढाका सोडून सुरक्षित ठिकाणी गेल्या असल्याचे वृत्त एएफपीने दिलं आहे. बांगलादेशमध्ये लष्करी राजवट लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना राजधानी ढाका सोडून गेल्या आहेत. ढाका इथं हिंसाचाराच्या घटना घडत असून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले आहे. शेख हसीना यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, शेख हसीना या त्यांच्या बहिणीसोबत गणभवन सोडून सुरक्षित ठिकाणी गेल्या आहेत. देशवासियांसाठी त्यांना एक भाषण रेकॉर्ड करायचे होते पण त्यांना संधी मिळाली नाही. बांगलादेशमधील जनतेने लाँग मार्च टू ढाकामध्ये भाग घेण्याचे आवाहन केल्यानंतर सरकारने इंटरनेट बंद केले होते. त्याआधी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आंदोलक आणि सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांमध्ये झटापट होऊन या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.

महिन्याभरापासून आंदोलनाचा भडका
गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान सरकारनं प्रथमच असं पाऊल उचललं आहे. यासोबतच सोमवारपासून तीन दिवसांची सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. बांगलादेशात संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यादरम्यान, शेजारील देशात हिंसाचाराच्या ताज्या घटना लक्षात घेऊन भारताने देखील रविवारी रात्री बांगलादेशमध्ये राहणाऱ्या भारतीयांना ‘अत्यंत सावधगिरी’ बाळगण्याचा आणि आपल्या हालचाल मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला आहे. भारताने आपल्या नागरिकांना पुढील आदेश मिळेपर्यंत बांगलादेशला न जाण्यास सांगितलं आहे.
Exit mobile version