| पनवेल | वार्ताहर |
बँक ऑफ महाराष्ट्रमधील सर्व कर्मचारी तसेच अधिकारी संघटनानी मिळून एकत्रित येऊन स्थापन केलेल्या युनायटेड फोरम ऑफ महा. बँक युनियनच्या वतीने 27 जानेवारी रोजी एकदिवसाच्या देशव्यापी लाक्षणिक संपाची हाक प्रामुख्याने नोकर भरतीच्या प्रश्नावर देण्यात आली आहे.
गेल्या दहा वर्षांत बँकेचा व्यवसाय 250% पटीने वाढला आहे, 450 नवीन शाखा उघडण्यात आल्या आहेत, तर कर्मचार्यांची संख्या मात्र 20% ने कमी झाली आहे. बँक गेल्या अनेक वर्षांपासून मृत्यू, निवृत्ती, राजीनामा यामुळे रिकाम्या झालेल्या जागादेखील भरत नाही. याचा परिणाम म्हणून लोकांना रोज जास्त वेळ काम करावे लागते, सुट्टीच्या दिवशीदेखील कामावर यावे लागते. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होत आहे. याशिवाय अपुर्या कर्मचारी संख्येमुळे समाधानकारक ग्राहक सेवा देता येणे अशक्य झाले आहे. याचा बँकेच्या व्यवसायावर देखील विपरीत परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून महा. बँकेतील कर्मचारी विलक्षण मानसिक तणावातून जात आहेत. सर्व संघटनानी या प्रश्नी आपली कैफियत वारंवार मांडली, पण व्यवस्थापन याला कुठलाच प्रतिसाद देत नाही हे लक्षात घेता नाईलाजाने संघटनानी शेवटचा मार्ग म्हणून शेवटी 27 जानेवारी संपाची हाक दिली आहे.
संपाच्या दिवशी कर्मचारी आपापल्या शाखांसमोर, कार्यालयासमोर निर्दशने, धरणे कार्यक्रम संघटित करून व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणांना आपला विरोध प्रदर्शित करतील. या संपात महा. बँकेतील सर्व कर्मचारी तसेच अधिकारी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन युनायटेड फोरम ऑफ महा. बँक युनियनच्या वतीने निमंत्रक विराज टीकेकर व सहनिमंत्रक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.