खासगीकरणाविरोधात बँक कर्मचार्‍यांचा संप

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाविरोधात बँक कर्मचार्‍यांचा दोन दिवसांचा संप आजपासून सुरु झाला. या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या संपात रायगड जिल्ह्यातील 303 शाखांमधील 2 हजार कर्मचारी सहभागी झाल्याने बँकांमधील दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने संपाची हाक दिली आहे. बँक ऑफ इंडिया ऑफिसर असोसिएशन, मुंबई आणि गोवा युनिटचे सहाय्यक महासचिव, अजय केशव सावंत यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग मधील स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया तसेच बँक ऑफ इंडिया कार्यालयासमोर निदर्शने करत निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी बँकेच्या खाजगीकरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हा संप पगारवाढीसह नव्हे तर लोकांसाठी हा संप आहे, असे संपकरी बँक कर्मचारी संघटनेने म्हटले आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2021 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात बँकांच्या खाजगीकरणाची घोषणा केली होती. आता सरकारने त्यादृष्टीने वेगाने तयारी सुरू केली आहे. याशिवाय सरकार या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक आणण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात येत आहे. हा संप देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना वाचवण्यासाठी असल्याचे बँक कर्मचार्‍यांच्या संघटनांनी म्हटले आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बँकिंग अधिकाराचे हनन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातून बँक उद्योग गेल्यास याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना अधिक बसणार आहे. या देशातील सामान्य नागरिकांचे बँकिंग अधिकार आणि त्याद्वारे आर्थिक विकासासाठी मिळणार्‍या सोयी सवलती वाचवण्यासाठी असल्याचे बँक कर्मचार्‍यांनी म्हटले आहे.

Exit mobile version