भ्रष्टाचार निर्मूलनासाठी बँक ऑफ महाराष्ट्राची मोहीम

| पनवेल | वार्ताहर |

बँक ऑफ महाराष्ट्र ही आपल्या बँकिंग सेवेसोबतच सामाजिक कार्यातसुद्धा नेहमीच अग्रेसर असते. अशाच एका सामाजिक उपक्रमात बँकेने पुढाकार घेतला तो म्हणजे भ्रष्टाचार निर्मूलनाचा. या अनुषंगाने बँकेने बांठिया हायस्कूल, नवीन पनवेल येथे विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकलेची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत 200 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

याप्रसंगी बँकेच्या महाप्रबंधक व झोनल मॅनेजर अपर्णा जोगळेकर, बांठिया हायस्कूलचे प्राचार्य श्री. माळी, पर्यवेक्षक जे.के. कुंभार, बी.यू. महाजन, एस.एल. पवार, बँकेच्या अधिकारी पूनम गर्जे व विशेष सहाय्यक अरविंद मोरे उपस्थित होते. याप्रसंगी अपर्णा जोगळेकर म्हणाल्या की, भ्रष्टाचार निर्मूलनासाठी खरी गरज ही मूल्यांची व संस्कार रुजविण्याची आहे व हे संस्कार चांगल्या प्रकारे शाळेतूनच विद्यार्थ्यांमध्ये रुजविले जाऊ शकतात म्हणून आम्ही बांठिया हायस्कूलची निवड केली. विद्यार्थ्यांची सृजनशीलता वाढीस लागावी या उद्देशाने बँकेने ही विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करून भ्रष्टाचार निर्मूलनाची मोहीम राबविली आहे. याप्रसंगी त्यांनी स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

शाळेचे प्रा. माळी म्हणाले की, बँक ऑफ महाराष्ट्राने खरोखर एक चांगला उपक्रम राबविला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चांगल्या कलागुणांना चालना मिळेल व एक चांगला भारत घडविण्यास हातभार लागेल. बँकेने याअगोदर विद्यार्थ्यांची हजारो खाती उघडून बँकेने त्यांच्यामध्ये बचतीची सवय रुजविली जे की भविष्यासाठी खूपच मोलाची आहे. त्यांनीसुद्धा विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

निबंध स्पर्धेत प्रथम रीमा पवार, द्वितीय दिया पोटे, तृतीय तेजस्वी खरगावकर, चित्रकला स्पर्धेत प्रथम पियुष चव्हाण, द्वितीय वेदांत खरात, तृतीय रेणुमा अन्सारी हिने पटकाविला. स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांना अपर्णा जोगळेकर व प्रा. माळी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे विशेष सहाय्यक अरविंद मोरे यांनी, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजश्री गुंड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अरविंद मोरे, महाजन, विजयकुमार जंगम, ज्ञानेश्‍वर पवार, योगिता पाटील व ज्योती यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version