। मुंबई । वृत्तसंस्था ।
शिवसैनिक संतोष परब मारहाण प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्याने आता नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. या प्रकरणावरुन आता विविध ठिकाणी पोस्टरबाजी दिसून येत आहे. मुंबईत नितेश राणेंच्या विरोधात तर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाकडून त्यांच्या समर्थनार्थ होर्डिंग लावण्यात आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे निवडणूक प्रचार प्रमुख कणकवली करंजे येथील माजी सरपंच संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला . त्यानंतर कणकवली पोलिसांनी हल्ला करून पळणाऱ्या पुणे येथील चौघांना ईनोवा गाडी सह फोंडाघाट नाक्यावर ताब्यात घेतले होते. या प्रकरणी एकूण सहा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. या प्रकरणी आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत, मनीष दळवी आदींची नावे तपासात समोर आली़ यामुळे पोलिसांनी आमदार राणे यांना नोटीस बजावली. या चौकशीला ते उपस्थित राहिले. मात्र अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दरम्यान, गुरुवारी शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग पोलीस नितेश राणेंचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून नितेश राणे गायब आहेत. त्यांच्याबाबत माहिती मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे. दरम्यान, या प्रकरणावरुन आता विविध ठिकाणी पोस्टरबाजी दिसून येत आहे.