मृत्तिकेच्या रुपात बाप्पा पुन्हा मूर्तिकारांकडे

| पनवेल | प्रतिनिधी |

गणेशमूर्ती पूजनानंतर, घरच्याघरी विसर्जन करून, उरलेली माती मूर्तिकारांना परत देऊन शून्य प्रदूषणाचा अभूतपूर्व उपक्रम खारघर, कामोठे, सुखापूर, पनवेल, नवीन पनवेल व करंजाडे येथील पनवेल वेस्ट वॉरियर्सने आयोजित केला होता.

या उपक्रमात घनश्याम पाटील, गौरी काशीकर, प्रल्हाद बोडके, तनय दीक्षित, विनोद शिंगण व वृषाली म्हात्रे यांनी कृतीतून जनजागृतीची मुहूर्तमेढ रोवली. मूर्तिकारांचा आर्थिक फायदा, पर्यावरण संरक्षण व मूर्तीच्या मातीतून परत देवाच्या मूर्ती घडून पवित्र व अध्यात्मिक लाभ अशी त्रिसूत्री असलेला कार्यक्रम गणेश शिंदे, प्रतिक्षा महाडिक, राजीव अधिकारी व तुषार लेले यांनी भक्तिभावाने साजरा केला.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात लवकर न विरघळल्याने, मूर्तीचे अवयव भंगतात. मोठाले तुकडे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे आणून प्रवाह तुंबतात. त्याचबरोबर जलस्त्रोतांची गढूळता, ऍसिडिटी, उष्णता व क्षारता वाढते. पाण्यातील ऑक्सिजन कमी होतो. प्रकाश कमी मिळाल्याने प्रकाश संश्‍लेषणात अडथळे येतात. मूर्तीच्या सिंथेटिक रंगातील जड व विषारी धातू पानवनस्पती व मास्यांमधून अन्नसाखळीत प्रवेश करतात. विसर्जनानंतर कृत्रिम तलावातून काढलेले डेब्रीस हे देखील प्रचंड मृदा प्रदूषण करते.

शुन्य प्रदूषणाचा निर्धार
दरवर्षी मूर्ती विसर्जनाचा आकडा 20 करोडच्या घरात जातो. पनवेल वेस्ट वॉरियर्सनी या परिस्थितीचा अभ्यास केला. काळाची गरज ओळखून मूर्ती घरच्याघरी विसर्जनानंतर राहिलेली मातीत मूर्तिकारांना भेट देऊन अनेक दुष्परिणाम थांबवण्याचा पायंडा पाडला. दगड, धातू वा मातीची मूर्ती हे पर्याय देखील डोळस नागरिकांपुढे आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी व वाहतूक कोंडी न करता, शून्य डेब्रीस, शून्य प्रदूषण व शून्य खर्चाचा हा उपक्रम लवकरच सर्वत्र करण्याचा मानस पनवेल वेस्ट वॉरियर्सचा आहे.

Exit mobile version